दसरा दिवाळीची तयारी आतापासून करा. आणि सणाच्या दिवशी सुंदर दिसा!
By Madhuri.pethkar | Published: September 21, 2017 07:00 PM2017-09-21T19:00:28+5:302017-09-21T19:05:43+5:30
दस-याला अजून नऊ दिवस आहे. आणि दिवाळी अजून बरीच लांब आहे. तुम्ही ठरवलं तर दस-या दिवाळीपर्यंत तुमच्या चेहे-यावरची आणि केसांची हरवलेली चमक परत मिळू शकते. यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही खास सणांसाठी म्हणून आजपासूनच सुरू करू शकतात.
- माधुरी पेठकर
दसरा, दिवाळी आली की नटावसं वाटतं, छान तयार व्हावसं वाटतं. आजूबाजूचा परिसर, घर जसं चमकतं तशीच चमक आपल्या त्वचेवर आणि केसांवर यावी असं कितीतरीजणींना वाटतं. त्यासाठी खास दिवस राखून ठेवले जातात. पार्लरमध्ये जावून त्यासाठी स्पेशल ट्रिटमेण्ट घेतल्या जातात. यात थोडे थिडके नाही हजारो रूपये जातात. पण ही पार्लरमधून कमावलेली महागडी चमक शेवटी चार दिन की चॉंदणीच ठरते. सणावाराचे दिवस सरायच्या आतच ही चमक धूसर झालेली दिसते.
अशी ब्यूटी ट्रीटमेण्टचा काय उपयोग?
अजूनही वेळ गेलेली नाही. दस-याला अजून नऊ दिवस आहे. आणि दिवाळी अजून बरीच लांब आहे. तुम्ही ठरवलं तर दस-या दिवाळीपर्यंत तुमच्या चेहे-यावरची आणि केसांची हरवलेली चमक परत मिळू शकते.
यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही खास सणांसाठी म्हणून आजपासूनच सुरू करू शकतात.
सोन्याचा अर्क
जो परिणाम पार्लरमध्ये गोल्ड फेशिअल करून मिळतो त्यापेक्षा चांगला परिणाम सोन्याच्या अर्काचा उपाय केला तर होवू शकतो. सोन्याच्या अर्काचा उपाय केल्यास त्वचा पुर्नज्जिवित होते. त्वचेला तजेला येतो. आणि चेहे-यावरच्या वयाच्या खुणाही जातात.
यासाठी दोन सोन्याची नाणी घ्यावीत. ती 100 मीलिलिटर पाण्यात सुमारे 20 मिनिटं उकळवावीत. नंतर गॅस बंद करून ती पाण्यात तशीच ठेवावीत. एका तासानंतर स्प्रेच्या बाटलीत ते पाणी भरावं. ते पाणी दिवसातून दोन वेळा चेहे-यावर स्प्रे करावं. या प्रयोगाला सोन्याची नाणी असलीच तर उत्तम नाहीतर चांदीची नाणीदेखील चालतील.
सुक्यामेव्याचं स्क्रबींग
चेहे-यावरची मृत त्वचा निघून गेली तर त्वचा नव्यानं श्वास घेवू शकते. ही मृत त्वचा निघून जाण्यासोबतच त्वचेचं पोषण होणंही गरजेचं असतं. यासाठी स्क्रबींग म्हणून तुम्ही काय वापरता हे महत्त्वाचं . यासाठी सुक्यामेव्याचा उपयोग केला तर फारच उत्तम.
यासाठी अर्धा चमचा केशर 20 मिनिटं चार चमचे दुधात भिजवावं. 10 बदाम आणि 5 पिस्त्यांची पूड करावी. 5 अंजीर घ्यावेत. आणि थोड्याशा दुधात वाटावेत. नंतर केशर भिजवलेलं दूध घेवून सर्व घटक यात मिस्क्स करावेत. मिक्स करताना यात एक 2 चमचे चंदनाची पावडर घालावी. ही पेस्ट चेहे-यास लावावी. वीस मिनिटानंतर चेहेरा स्वच्छ करावा. संत्र्याच्या रसात कापूस बुडवून चेहेरा पुसून घ्यावा. आणि त्वचा जर कोरडी असेल तर मग पाच चमचे पाणी घेवून त्यात एक चमचा मध घालावं. आणि त्या पाण्यात कापूस बुडवून स्क्रब काढावं. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.
जास्वंदीच्या फुलांचा मसाज.
चेहे-यासोबतच हात आणि पायही चमकायला हवेत. यासाठी जास्वंदीची फुलं कामास येतील. दोन चमचे जास्वदींच्या फुलांची पेस्ट , दोन चमचे गुलाबांच्या पाकळ्यांची पेस्ट घ्यावी. एक चमचा साय घेवून या पेस्ट सायीत कालवाव्यात. हे मिश्रण मग हाता पायांवर लावावं. दहा मिनिटानंतर पाण्यानं हात पाय धुवून घ्यावेत.
केसांसाठी पॅक
सुंदर दिसण्यात केसांचीही भूमिका महत्त्वाची असते. समजा केस खराब झाले असतील तर मग काही उपाय तातडीनं करायला हवेत. यासाठी केसांना नुसतं तेल लावून मसाज करणं पुरत नाही. केसांना पोषक तत्त्वं मिळतील असे पॅक आणि मास्क लावणं गरजेचं असतं. मास्कसाठी दोन चमचे आवळा पावडर , दोन चमचे मेथ्यांची पावडर, दोन चमचे रिठा पावडर, दोन चमचे शिकाकाई पावडर आणि दोन चमचे त्रिफळा पावडर घ्यावी. दोन अंड्याच्या बलकामध्ये किंवा योगर्टमध्ये या पावडर मिक्स करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावी. 45 मिनिटं केसांवर ती तशीच राहू द्यावी. नंतर केस शाम्पूनं धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा करावाच.
केसांचा मास्क
यासाठी एक कप झेंडूच्या फुलांची पेस्ट, एक कप जास्वंदीची पानं आणि फुलांची पेस्ट आणि अर्धा कप गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्यांची पेस्ट घ्यावी. हे सर्व एकत्र करून ही पेस्ट केसांना लावावी. वरून शॉवर कॅप घालावी. केस धुतांना शाम्पूमध्ये मुलतानी माती मिक्स करून केसांना लावावी. आणि केस धुवावेत.