चिमुकल्यांची हेअर स्टाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 04:42 PM2017-04-10T16:42:58+5:302017-04-10T16:42:58+5:30
लहान मुलींच्या केसांकडे पाहूनच कळतं की या पाच सहा वर्षांच्या चिमुरड्यांना नटायला मुरडायला किती आवडतं ते.
- मोहिनी घारपुरे- देशमुख
लहान मुलींच्या केसांकडे पाहूनच कळतं की या पाच सहा वर्षांच्या चिमुरड्यांना नटायला मुरडायला किती आवडतं ते. मुलींची नटण्याची ही हौस पुरवण्यासाठी जेवढ्या त्यांच्या आया झटतात तितकं मार्केटही. लहान मुलींच्या आवडी निवडी लक्षात घेवून मार्केटमध्ये भरपूर अॅक्सेसरीज उपलब्ध आहे.
लहान मुली तशाही खूपच गोड आणि सुंदर दिसतात. या चिमुकल्या मुलींचा गोड गुलाबी रंग, निरागस भाव आणि कपाळावर रूळणारे केस हे एवढंच सौंदर्यही आपल्याला अगदी वेड लावतं. बोबडे बोल आणि हसरा चेहरा थेट मनाला भिडतो. या चिमुकल्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी हल्ली बाजारात भरपूर अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.
टिकटिकच्या पिना
त्यापैकी विशेषत्त्वानं वापरल्या जाणाऱ्या टिकटिकच्या पिनांची तर अलिकडे खूपच फॅशन आहे. या पिना लावायला सोप्या, वापरायलाही फारशा अवघड नसल्यानं आणि लहान मुलींच्या केसांना अजिबात त्रास न देणाऱ्या असल्यानं जवळपास सर्वच चिमुकल्या त्या वापरताना दिसतात. फुलं, पानं, कार्टून कॅरेक्टर्स असं काहीही या पिनांवर असू शकतं. लहानमुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या पिना त्यांच्याकरिता खास बनवल्या जातात. लहान मुलींसाठी फंक्शनली वापरण्याजोग्या हेअरपिन्सही बाजारात उपलब्ध आहेत. या हेअरपिन्सवर स्टोन्स लावलेले असतात. आकर्षक रंगाचे स्टोन्स लावलेल्या या पिनाही चिमुकल्यांना फारच आवडतात आणि शोभूनही दिसतात.
हेअरबेल्ट्स
कापडी आणि प्लॅस्टिकचे अक्षरश: हजारो प्रकारचे हेअरबेल्ट्स लहान मुलींसाठी बाजारात उपलब्ध आहेत. हे हेअरबेल्ट्सदेखील मुलींना आवडतील अशा आकर्षक डिझाईन्सचे मिळतात. बॉबी प्रिंट्स, फ्लोरल प्रिंट्स, कार्टून कॅरेक्टर त्यातही विशेषत: बार्बी आणि छोटा भीममधील चुटकी या कॅरेक्टर्सना जास्त पसंती दिली जाते.
बीट्स
अनेक लहान मुलींना बीट्सदेखील आवडतात. केसांच्या तीन तीन बटा घेऊन त्याच्या लहान लहान अशा अनेक वेण्या घालायच्या आणि टोकाशी हे बीट्स लावून द्यायचे म्हणजे अगदी सुंदर हेअरस्टाईल होते. वेणी न घालताही बटांच्या टोकाशी निरनिराळ्या रंगाचे बीट्स लावले तर फारच मस्त लुक येतो.