बटनापासून खूप काही...
By admin | Published: April 12, 2017 05:22 PM2017-04-12T17:22:00+5:302017-04-12T17:38:23+5:30
हसतखेळत, रमत-गमतही कलाकुसर करता येते. खरं वाटत नसेल तर एक गंमत नक्की ट्राय कराही गंमत करण्यासाठी गरजेचं असलेलं साहित्य आधी जमवून घ्या
- सारिका पूरकर-गुजराथी
हसतखेळत, रमत-गमतही कलाकुसर करता येते. खरं वाटत नसेल तर एक गंमत नक्की ट्राय करा
ही गंमत करण्यासाठी गरजेचं असलेलं साहित्य आधी जमवून घ्या. लक्षात घ्या, तुम्हाला लागणार आहेत खूप सारे बटन्स. जे आपण शर्ट्स, पॅण्टसाठी वापरतो ते हे बटन्स. जमवा आणि नसेल घरात तर सरळ विकत आणा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे बटन्स खूप कलरफुल असले पाहिजेत. निरनिराळ्या रंगांचे बटन्स तुमच्याकडे हवेत. दुसरी गोष्ट, हे बटन्स विविध आकारांचे म्हणजेच गोल, चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी आणि लहान-मोठ्या आकारांचे असावेत. जोडीला डिंक लागेल. एवढं जमलं की कामाला सुरूवात करता येते.
१) कोणतीही लॅम्पशेड (टेबललॅम्पची) घ्या. कापडी, काचेची कोणतीही चालेल. त्यावर हे बटन्स फेविकॉलच्या सहाय्यानं संपूर्ण भागावर चिकटवून घ्या. पूर्णपणे वाळू द्या. बघा, लॅम्पशेड किती कलरफुल होऊन जाईल! दिवा लावलेला असतानाही आणि नसतानाही ही लॅम्पशेड तितकीच सुंदर दिसेल आता.
२) भिंतीवरची टिपिकल घड्याळं पाहून बोअर झालं असेल तर मग आपल्या बटन्सपासून घडयाळ बनवता येतं. त्यासाठी ज्यूटचं कापड घ्या. हे कापड भरतकाम करण्यासाठी जी रिंग वापरतात त्यात फिट करा. गोलाकाराच्या बाजूनं जे कापड जास्तीचं आहे ते कापून टाका. भरतकामाच्या रिंगवर वरच्या बाजूनं जे स्क्रू असतात त्यावर रंगीत धागा गुंडाळून ते झाकून टाका. आता या रिंगवर जे ज्यूटचं कापड आपण लावलं आहे, त्यावर घड्याळाच्या आकड्यांच्या जागेप्रमाणे विविधरंगी बटन्स दोऱ्यानं शिवून टाका. गोलाकाराच्या मध्यभागी काटे आणि मागे घड्याळाचं मशीन फिट करून घेतलं की आपल्याला हवं तसं घड्याळ तयार होतं.
३) शूजलासुद्धा या बटन्सच्या मदतीनं नवीन लूक देता येतो. कॅॅनव्हास शूज, मुलींचे बॅली शूज यावर सर्व बाजूंनी विविधरंगी बटन्स चिकटवून टाका. रंगांची बहार असलेले हे शूज घातल्यावरही मस्तच दिसतील...शोल्डर बॅगवर देखील बटन्स लावून डेकोरेट करता येईल.
४) बटन्सचा वापर करून फोटोफ्रेमही सहज तयार करू शकता. फ्रेमच्या कडांवर चारही बाजूंनी हे बटन्स चिकटवून टाका. रंगीबेरंगी फोटोफ्रेम तयार होईल.
५) एक फुगा फुगवून घ्या. त्याचं टोक बांधून टाका. बुडाकडच्या भागापासून अर्ध्या भागापर्यंत फेविकॉल लावा. त्यावर बटन्स चिकटवा. ते पूर्ण वाळू द्या. नंतर फुगा फोडून टाका. झाला बटन्सपासून बाऊल तयार. या बाऊलमध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता.
६) काही कंटेनर्सची झाकणं, कंटेनर्सही बटन्स लावून सजवू शकता. याशिवाय फ्लॉवरपॉट, झाडांच्या कुंड्यांवरही बटन्स लावून त्यांना आकर्षक बनवू शकता.
७) बटन्सपासून ब्रेसलेट, नेकलेस, अंगठी अशी हलकी-फुलकी ज्वेलरी तयार करू शकता. निरनिराळे हुक्स, कड्या, चेन वापरून ही ज्वेलरी सहज तयार होते.
८) याबरोबरच बटनांचं झाडं,पानं-फुलं असं डिझाइन काढून छान ग्रीटिंग कार्ड तयार होऊ शकतं. एवढंच नाही तर तुमच्या दुधाच्या किंवा चहाच्या कपावरही रंगीबेरंगी बटन्स लावून तुम्ही ते डेकोरेट करू शकता.