'जेल'मधलं आयशॅडो; पापणी लवताच सगळे होतील घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 03:57 PM2018-01-29T15:57:44+5:302018-01-29T16:01:28+5:30
नाकाचा शेंडा आणि डोळ्यातलं तेज समोरच्याला 'याड' लावू शकतं. स्वाभाविकच, चेहऱ्याच्या मेक-अपइतकाच डोळ्यांचा मेक-अपही 'मस्ट' आहे.
- गीता खेडेकर
'मुलगी नाकी-डोळी नीटस आहे हो', हे वाक्य अगदी पूर्वापार चालत आलंय. मुलींचं-स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्यात नाक आणि डोळे किती महत्त्वाची भूमिका बजावतात, हे त्यावरून सहज लक्षात येतं. नाकाचा शेंडा आणि डोळ्यातलं तेज समोरच्याला 'याड' लावू शकतं. स्वाभाविकच, चेहऱ्याच्या मेक-अपइतकाच डोळ्यांचा मेक-अपही 'मस्ट' आहे. हा मेक-अप सोपा आणि टिकाऊ करण्यासाठी 'जेल आयशॅडो' बाजारात दाखल झालं आहे.
पावडरी टेक्श्चरमधलं आयशॅडो हे महिला मंडळाच्या मेक-अप बॉक्समधील अविभाज्य घटक झालं आहे. पण, ही जागा जेल आयशॅडो घेऊ शकतं. कारण, ते नेहमीच्या आयशॅडोपेक्षा जास्त वेळ टिकतं आणि अधिक उठूनही दिसतं. या आयशॅडोमध्ये चकाकणारी चमकीही महत्त्वाची असते. लहानशा डबीत, उभ्या बाटलीत किंवा चपट्या आयशॅडो पॅलेटमध्ये हे जेल आयशेडॉ उपलब्ध आहे.
जेल आयशॅडो हे साध्या आयशॅडोप्रमाणेच सोप्या पद्धतीने लावले जाते. ब्रशने किंवा ब्रशचा वापर न करताही तुम्ही जेल आयशॅडो लावू शकता.
* जेल आयशॅडो कसं लावावं -
>> तुम्हाला आवडणारी एखादी शेड निवडा.
>> जेल आयशॅडो ब्रशने किंवा हाताने पापणीवर लावा.
>> जेल आयशॅडो लावताना ते कमी घ्या आणि हलक्या हाताने लावा.
>> ते जास्त लावल्यास चमकीची चमचम पाहणाऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
>> याचा बेस क्रीमी असल्याने ते नीट पसरवा.
>> यात चमकी असली तरी योग्य शेड्स निवडून ते सकाळीही वापरता येऊ शकते.
(टिप- सकाळी लावणारी शेड ही शक्यतो गडद रंगाची नसावी.)
मॅट मेकअपच्या ट्रेंडमध्ये जेल आयशॅडो अगदी उठून दिसते. तुम्ही बोल्ड रंगाचे आयशॅडो लावणार असाल तर आधी बेसला एखादी मॅट न्यूड शेडची लिपस्टिक लावा. जेल आयशॅडो नीट पसरेल याची काळजी घ्या. चकाकी असणाऱ्या या शेड्सवर साजेसं असं मॅट आयलायनर लावून डोळ्यांच्या खाली मेटॅलिक काजळ किंवा लायनर लावलं तर तुमचा लुक एकदम झक्कास दिसेल.
जेल आयशॅडो हे लाँग लास्टिंग असल्याने त्याला सारखं टच-अप करायची गरज भासत नाही. गरज असल्यास त्याच शेडला पार्ट न लावता त्याचा कॉन्ट्रास्ट शेड लावणं कधीही उत्तम.
* मेकअप काढताना-
मेकअप काढण्याच्यावेळी क्लीन्सिंग मिल्क लावण्याआधी हा आय मेक-अप ओल्या टिश्यूने किंवा कापूस तेलात बुडवून काढा. त्यानंतर क्लीन्सिंग मिल्क वापरून संपूर्ण मेक-अप काढा.