गळ्यात फक्त चोकर हवा!
By admin | Published: April 7, 2017 07:16 PM2017-04-07T19:16:10+5:302017-04-07T19:16:10+5:30
महागडे हार , नेकलेस, चेन हेच घातल्यावर गळा शोभून दिसतो असं नाही तर एक साधा चोकरही गळ्याला देखणेपणा देतो.
कापडापासून किंवा मेटलपासून बनवलेले गळ्यात घालायचे चोकर एकदम हटके लुक देतात. साधारणत: 70 ते 80 च्या दशकात हे चोकर एकदम इन होते. बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान, परवीन बाबी आणि त्यानंतरच्या काळात टीना मुनीम यांनी हे चोकर गळ्यात घालून मिरवले. नुसत्याच चित्रपटासाठी नव्हे तर हे चोकर त्यांचं स्वत:चंही स्टाइल स्टेटमेण्ट झालं होतं.
प्लाझो पँट्स , मोठ्या गळ्याचे टॉप्स आणि त्यावर अन्य कोणत्याही दागिन्यांऐवजी चोकर एवढाच काय तो साझ असायचा. पण हा एवढाच चोकर त्यांच्या स्पेशल लूकची गरज पूर्ण करायचा.
मधल्या काळात सिनेमातून आणि नेहेमीच्या वापरातून गायब झालेले हे चोकर हल्ली बाजारात पुन्हा नव्यानं दिसू लागले आहेत. किंबहुना त्याच धाटणीची गळ्यातली टॅटूस्टाईल आणि अँक्लेटही बाजारात उपलब्ध झाली आहेत.
लेदर, वेलवेट, रिबनपासून हे चोकर बनवले जातात. इतकेच नव्हे तर स्टोन्स लावलेले सिल्व्हर कोटेड आणि मेटलचे देखील चोकर आॅकेजनली वापरले जातात. पारंपरिक दागिने पारंपरिक सणांना जितक्या हौसेनं घातले जातात त्याच हौसेनं वेस्टर्न ड्रेसेसवर हे चोकर परिधान करणाच्या ट्रेण्ड हल्ली फॅशन जगतात आहे. अलिकडे अनेक फॅशन इनस्टिट्यूट्समध्ये या चोकरवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचबरोबर अनेक फॅशन डिझायनर्सही या चोकर्सवर काम करत आहेत. वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेले हे चोकर म्हणूनच आज फॅशनची हौस असलेल्या अनेकींच्या गळ्यातले ताईत झाले आहेत.