कॉलरचे हे प्रकार वापरून माहित असतील पण ऐकून नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 06:22 PM2017-12-13T18:22:40+5:302017-12-13T18:30:41+5:30
विविध प्रकारच्या कॉलरचे ड्रेस वापरून झालेले असतात. पण आपल्या लेखी फक्त ड्रेसला महत्त्व. पण कॉलरच्या विशिष्ट दिमाखामुळे फक्त कॉलरसाठीही ड्रेस घेतले जातात. या दिमाखदार कॉलर माहित आहे का तुम्हाला?
- मोहिनी घारपुरे-देशमुख
कॉलरच्या जन्मानंतर आतापर्यंत कॉलरच्या प्रकारांमध्ये एवढं प्रचंड नाविन्य आणि कल्पकता वापरली गेली आहे अन त्यामुळेच कॉलरचे अनेक आणि अनोखे प्रकार पहायला मिळत आहेत.
न ऐकलेले कॉलरचे प्रकार
1. रोल्ड कॉलर - या प्रकारची कॉलर गळ्याभोवती रोल केलेली असून गळ्याच्या एकाच बाजूने ती टोकापर्यंत पूर्णत: दिसते. अगदी नावाप्रमाणेच ती रोल केली जाते.
2. डॉग इअर कॉलर - एखाद्या श्वानाच्या कानाप्रमाणे ही कॉलर असते. वेगवेगळ्या जातींच्या श्वानाचे कान वेगवेगळे आणि तोच दुवा या प्रकारच्या कॉलर्समध्येही वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलर्स या प्रकारातही दिसतात.
3. कोसॅक कॉलर - हाय स्टॅण्डींग कॉलरला एका बाजूनं ओपन ठेऊन त्यावर ठिकठिकाणी कापून त्यावर एम्ब्रॉयडरी केलेल्या कॉलर म्हणजे कोसॅक कॉलर. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या डॉक्टर झिव्हागो या चित्रपटात या प्रकारच्या कॉलरचे जॅकेट्स वापरले गेले होते. त्यानंतर ही कॉलर खूप प्रसिद्ध झाली.
4. टॅब कॉलर - बेसिकली या कॉलर म्हणजे पॉर्इंट कॉलर्सच असतात पण त्याला खालच्या बाजूनंआणखी एक बटन आणि काजं केलेलं असतं. विशेषत: टाय घालणा-या लोकांना या टॅब कॉलर्सच्या शर्टचा वापर करणं अधिक सोयीचं जातं. मात्र असं असलं तरीही हल्ली या प्रकारच्या कॉलर काहीशा मागे पडल्या आहेत.
5. जिराफ कॉलर - पोलो नेक ज्याप्रमाणे असतो त्याचप्रमाणे ही गोलाकार परंतु गळ्याभोवती काहीशी उंच अशी कॉलर असते. जिराफाप्रमाणे उंच म्हणूनच या कॉलरचे नाव जिराफ कॉलर असे आहे.
6. मॉडेस्टी कॉलर - ही कॉलर अत्यंत सुंदर दिसते. विशेषत: लेस किंवा तलम कापडाच्या सहाय्यानं ही कॉलर कपड्यावर विणली जाते. महिलांच्या पोषाखावरच ही कॉलर डिझाइन करता येते.त्यामुळे पोषाखाचा नाजूक गळा अधिक सौंदर्यपूर्ण दिसतो. मागून गोलाकार आणि पुढून व्ही आकारात ही कॉलर छातीपर्यंत खाली आकारली जाते.
7. फिचू कॉलर - या पद्धतीच्या कॉलर्स पूर्वी ब्रिटीश काळातील स्त्रिया-पुरूषांच्या पोषाखावर सर्रास दिसतात. या कॉलर्स मुख्यत: व्ही आकाराच्या गळ्यावर किंवा बंद गळ्यावर शोभतात. पफ्ड ट्यूल, लेस, पांढºया रंगाच्या प्लीटेड लेस यांचा वापर करून या कॉलर्स बनवल्या जातात. यामध्येही वेगवेगळ्या आकाराचे फिचू तयार करून कॉलर म्हणून लावले जातात. फिचू या शब्दाचे भाषांतर पाहिले तर हिंदीत या शब्दाचा अर्थ, लेस का दुपट्टा असा सापडतो. त्यानुसारच लेसच्या, किंवा तलम कापडाच्या, नेटच्या कापडाच्या वेगवेगळ्या आकारात या कॉलर्स पोषाखांवर लावल्या जातात. या कॉलर्स अत्यंत मोहक दिसतात.
8. क्लब कॉलर - पत्त्यांमधील किल्वरच्या फुलाप्रमाणे या कॉलर्सची डिझाइन असते. विशेषत: पुरूषांच्या शर्ट्सला ही कॉलर अत्यंत शोभून दिसते. या कॉलरला एक मोठा इतिहासच असल्याचे काही संदर्भ सापडतात. 19 व्या शतकाच्या प्रारंभी क्लब कॉलर खूप प्रचलित झाली. त्यानंतर या कॉलर्समध्येही खूप वैविध्य आले. बटन डाऊन कॉलर, फॉरवर्ड पॉर्इंट कॉलर, स्प्रेड कॉलर या सगळ्यांना क्लब कॉलरमध्ये कन्व्हर्ट करणंही फार सोपं होतं.
9. बिब वुईथ फ्रील कॉलर - आपल्याकडे बिब या शब्दासाठी लाळेरं हा प्रतिशब्द आहे. अगदी लहान मुलांना अंगावर काही सांडू नये, त्यांचे कपडे खराब होऊ नयेत यासाठी लाळेरं गळ्यात बांधतात. काहीशी तीच स्टाईल या प्रकारच्या कॉलर्सची असते. गळ्यापासून ते छातीपर्यंत खाली रु ळणारा कपडा आणि त्याला फ्रील अशी रचना या प्रकारच्या कॉलर्सची असते. या कॉलर्स विशेषत: स्कर्टवरील टॉपसाठी वापरल्या जातात. त्याचबरोबर फ्रॉकला देखील अशा प्रकारच्या कॉलर्स खूपच सुरेख दिसतात.