करिअर बदलताना हे लक्षात घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2016 04:51 PM2016-09-02T16:51:02+5:302016-09-02T22:21:02+5:30

पुढील काही गोष्टींचा नीट विचार करूनच नव्या क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घ्या.

Remember this when changing a career! | करिअर बदलताना हे लक्षात घ्या!

करिअर बदलताना हे लक्षात घ्या!

Next
बी देओल आठवतो? मोठ्या पडद्यावर त्याला पाहून आता बराच काळ झाला आहे. पण सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलीवूडमध्ये नवी संधी मिळत नाही म्हटल्यवर त्याने नव्या क्षेत्रात नशीब अजमावण्याचे ठरवले. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तो ‘डीजे’ झाला. दिल्लीतील एका क्लबमध्ये त्याने शोदेखील केला.

पण मदमस्त, ऊर्जाशील संगीतावर थिरकण्यासाठी आलेल्या लोकांसाठी बॉबीने ‘गुप्त’ चित्रपटातील गाणी वाजवली. यामुळे नाराज आणि रागावलेल्या लोकांनी आयोजकांना शोच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली (?). यातील गंमतीचा भाग सोडला तर यातून आपल्या करिअरविषयी शिकण्यासारखे खूप आहे. 

शिकत असताना ‘करिअर’ नावाचा शब्द सतत आपल्या मानगुटीवर बसलेला असतो. मोठेपणी काय व्हायचं, कशामध्ये करिअर करायचं, असे हमखास विचारले जाते. दहावी-बारावी नंतर तर ‘करिअर आॅप्शन’ निवडण्याची आपल्यावर जणू काही जबरदस्तीच केली जाते. बरेच जण मग आवडी-निवडी-पॅशन बाजूला ठेवून ठरवून दिलेली, पठडीतील वाटेवर जाण्याची ‘सेफ’ खेळी खेळतात. परंतु जेव्हा निवडलेल्या क्षेत्रात प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा न राहून डोक्यात ‘जर...तेव्हा वेगळे करिअर निवडले असते तर’ असे विचार यायला लागतात.

Bobby

काही जण ‘करिअर-स्वीच’ करण्याचा धाडसीपणा करतातदेखील. पण असे करताना आपल्यापैकी प्रत्येक जण यशस्वी होईलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील काही गोष्टींचा नीट विचार करूनच नव्या क्षेत्रात उडी मारण्याचा निर्णय घ्या.

१. रिसर्च :

नव्या क्षेत्रात पाऊल ठेवताना पुरेशी माहिती घेणे अत्यावश्यक असते. केवळ मनात विचार आला म्हणून किंवा एकाकी आलेल्या उर्मीवरून एवढा मोठा निर्णय तडकाफडकी घ्यायचा नसतो. नियोजित क्षेत्राची/कंपनीची आर्थिक स्थिती, त्या क्षेत्रातील आव्हाने, त्यासाठी लागणारी कौशल्ये, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड, करिअरवृद्धीचे पर्याय असा सारासार विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये अनुभवी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे तर अति उत्तम.

२. केवळ पैसा नाही :

केवळ सध्यापेक्षा जास्त पैसा मिळतोय म्हणून करिअर स्वीच करू नका. अल्पकाळातील फायदा न पाहता लाँग टर्म परिणामांचा विचार करावा. जॉब प्रोफाईल, रँक, जबाबदाºया, अधिकार हे सर्व घटक विचारात घेऊन निर्णय घ्यावा. केवळ पैशासाठी जॉब/करिअर बदलणाºया उमेदवाराला भविष्यात ‘संधीसाधू’ म्हणूनही नाकारले शकते.

३. हेतू :

क्षेत्र बदलण्याचा आपला प्रामाणिक हेतू आधी तपासून बघा. बरेच जण केवळ सध्याच्या नोकरीमध्ये खूश नाही म्हणून जॉब/कंपनी बदलतात. काही करून त्यांना ‘या’ क्षेत्रापासून दूर जायचे असते. म्हणून मग ते समोर दिसेल/मिळेल त्या संधीचा स्वीकार करतात. पण असे केल्यामुळे करिअरवृद्धीला ब्रेक लागू शकतो.

४. स्वत:ची क्षमता :

कित्येक लोक स्वत:च्या क्षमतांविषयी अवाजवी अपेक्षा बाळगतात. दुसऱ्या क्षेत्रात गेलो तर आपण अधिक मन लावून काम करू, असे ते स्वत:ला सांगत असतात. परंतु वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण खरंच नव्या जॉबसाठी योग्य आहोत का हे विचारा. निरपेक्षपणे स्वत:चे मूल्यांकन आणि परीक्षणे करा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की, करिअर ट्रॅक बदलण्याची जोखीम स्वीकारावी की नाही.

५. धावत्याचे मागे पळू नका :

सध्या अमुक-अमुक क्षेत्राचा बोलाबाला आहे किंवा तुमचा मित्र एखाद्या क्षेत्रात चांगला प्रगती करतोय म्हणून करिअर बदलू नका. वर सांगितल्याप्रमाणे तुमची क्षमता, कौशल्य आणि अनुभवाला साजेसे अशाच पर्यायांचा विचार करावा. केवळ अ‍ॅडव्हेंचर म्हणून नव्या क्षेत्रात उडी मारू नका. धावत्याच्या मागे पळणे बरे नाही.

हे देखील महत्त्वाचे...

नव्या क्षेत्रातील कौशल्ये आणि माहिती मिळवणे पुरेसे नाही. त्यामुळे  सार्वजनिक आणि खासगी जीवनात उद्भवणाऱ्या नव्या आव्हानांचादेखील विचार व्हावा. कदाचित राहते घर बदलावे लागू शकते. पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करणे अनेकांना अवघड जाते. चोहीबाजूने सर्व घटकांचा शांत डोक्याने अभ्यास केल्यावरच निर्णय घेतला पाहिजे.

Web Title: Remember this when changing a career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.