पावसाळ्यात सौंदर्य जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:54 AM2017-07-20T02:54:30+5:302017-07-20T02:54:30+5:30
ऐन पावसाळ्यातही गरमीने त्रासलेल्या मुंबईकरांना आता कुठे पावसाळा ‘एन्जॉय’ करायला मिळतोय. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पंधरवड्यानंतर
- डॉ. मोहन थॉमस,
(वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन)
ऐन पावसाळ्यातही गरमीने त्रासलेल्या मुंबईकरांना आता कुठे पावसाळा ‘एन्जॉय’ करायला मिळतोय. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पंधरवड्यानंतर मुंबईत दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या पावसामुळे पिकनिकच्या प्लानिंगलाही वेग आला आहे. पण पावसात मनसोक्त भिजताना त्वचा आणि केस यांचे सौंदर्य जपायला हवे. पावसाळ्यात तुमची त्वचा आणि केस यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तुमचे केस जास्त काळ ओले असतात. आंघोळ केल्यावर केस वाळवण्यासही खूप कष्ट पडतात आणि दमट हवामानामुळे केस ओलसरही राहतात. ओल्या केसांमुळे दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात तुमची त्वचा, केस आणि शरीर सुदृढ आणि चांगले राहावे यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात सुती कपडे वापरा कारण त्यांचा त्वचेला किमान त्रास होतो. सुती कपडे वाळायला वेळ लागतो हे खरे असले तरी सुती कापडाइतके त्वचेचे चांगले संरक्षण दुसरे कोणतेच कापड करत नाही. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, जेणेकरून डास आणि इतर किडे तुम्हाला चावणार नाहीत. कारण पावसाळ्यात डबक्यांशेजारी त्यांची पैदास वाढलेली असते.
चामडे, प्लॅस्टिक किंवा कॅनव्हासची पादत्राणे घालू नयेत. स्लीपर किंवा सँडल घालणे चांगले कारण त्यामुळे तुमचे पाय मोकळे राहून पाणी साचून राहत नाही. तुम्ही बूट घालत असाल तर प्रादुर्भाव टाळण्यासाठी अँटि-फंगल पावडर लावा. लवकरात लवकर तुमचे पाय कोरडे करा. कोरडे मोजे वापरा. जेव्हा ते ओले होतात तेव्हा ताबडतोब काढून साबण आणि स्वच्छ पाण्याने ते धुऊन टाका. पायांना फंगल संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यामुळे कंड येऊ शकते. पावसाळ्यात नखे वेळीच कापा कारण नखे लांब असतील तर तुमच्या पादत्राणांमुळे तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि जखमा होण्याची शक्यता असते.
तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या पायांची विशेष काळजी घ्या. ग्लायकॉलिक किंवा सॅलिसायलिक आम्ल समाविष्ट असलेला फेसवॉश वापरा, कारण त्याने तुमची त्वचा ताजीतवानी होते. हे घटक मळ काढून टाकतात आणि चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी करतात. केवळ उपलब्ध आहे म्हणून कोणत्याही साबणाने तुमचा चेहरा धुणे शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे जास्त खसखसून
चेहरा धुऊ नका. कारण तसे केल्यास चरबीच्या ग्रंथी रिबाउंड होऊ
शकतात.
मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रबचा वापर करा. एक्सफोलिएट करण्यासाठी कोणताही चांगला फ्रूट स्क्रब वापरू शकता. वातावरण ढगाळ असले तरी सनस्क्रीन लावणे टाळू नका, कारण सनस्क्रीन न लावल्यास तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून धोका असतो. टायटॅनिअम डायआॅक्साईड किंवा मायक्रोनाईज्ड झिंक समाविष्ट असलेले सनस्क्रीन वापरा, जे तुम्हाला उत्तम प्रकारे संरक्षण देईल. तुमची त्वचा तेलकट असेल तर नॉन-कॉमेडोजेनिक (छिद्र न बुजविणाऱ्या) पाण्याचा बेस असलेला मेक अप वापरा. झोपण्यापूर्वी तुमचा मेकअप काढायला विसरू नका. आर्द्र हवामान आणि पावसाळ्यात तेलकट त्वचा ही मुख्य समस्या असली तरी काही जणांची त्वचा पावसाळ्यात कोरडी आणि डिहायड्रेटेड असल्याजे जाणवते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांच्याबाबतीत असे घडते. अशा वेळी मॉइश्चरायझर वारंवार लावावे.
घरगुती उपाय
कोंड्याला प्रतिबंध करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग आणि बदामाचे तेल यांचे मिश्रण करून ते केसांना लावावे. ते वाळू द्यावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवावे. खोबरेल तेलात लिंबाचा रस घालावा आणि केसांना मसाज करावे. केस ओलसर टॉवेलने झाकून ठेवावेत. २० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुऊन टाकावेत. यामुळे तुमचे केस सुदृढ आणि कोंड्यापासून मुक्त होतील. त्वचेसाठी बेसन, दूध, लिंबू आणि मध यांचे मिश्रण करून लावावे. त्यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी व उजळ दिसू लागेल.