सेल्फीचे तरुणाईला घातक वेड
By Admin | Published: July 13, 2017 02:22 AM2017-07-13T02:22:02+5:302017-07-13T02:22:02+5:30
नागपूर-कळमेश्वर तालुक्यातील वेणा जलाशयात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे.
प्राची सोनवणे
नुकतीच नागपूर-कळमेश्वर तालुक्यातील वेणा जलाशयात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांनी जीव गमावल्याची घटना घडली आहे. अशा वेळी सेल्फीवेड्या पिढीने सेल्फी कुठे, कधी, कसा काढावा, याबाबत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. सेल्फी काढण्याचे व्यसन अनेकांना लागले असून, त्याचे प्रमाण तरु णाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. कोणतीही सवय ठरावीक मर्यादेपर्यंत ठेवावी, तिची अतिशयोक्ती घातक ठरू शकते.
सेल्फी काढला न काढला तोच तो फोटो फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, फ्लिकर, गुगल प्लस, टिंबलर, मायस्पेस, स्नॅपचॅट, वुईचॅट, हाइक अशा सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करण्याची क्रेझ तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात दिसून येते. सर्व वयोगटांत सेल्फीचा नाद वाढत असून, त्यात स्वत:च्या किंवा दुसऱ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत आहे. या आधीचे शतक हे दारू-ड्रग्ज आदी व्यसनांचे होते. मात्र, एकविसावे शतक हे ‘बिहेविअरल अॅडिक्शन’चे असणार आहे. माणूस आणि तंत्रज्ञान या नात्यामधल्या ताण-तणावाचा हा परिपाक आहे. तंत्र आणि तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय. मुलांचा कुटुंबीय आणि शेजाऱ्यांशी संवाद कमी होतोय. वागणूक विक्षिप्तपणाकडे झुकू लागली आहे. सगळ्यांशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद होत असल्यामुळे प्रत्यक्ष संवादासाठी, सामाजिक व्यवहारांसाठी लागणाऱ्या कौशल्याचा त्यांच्याकडे अभाव निर्माण होऊ लागला आहे. पालकदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सेल्फी हे तरु णांमध्ये वाढते फॅड आत्ता आजार बनत असल्याने या पिढीला कसा आवर घालायचा? हा पालक आणि शिक्षकांसमोरचा मोठा प्रश्न आहे.