स्कर्टची फॅशन कधीच कालबाह्य होणार नाही! स्कर्टचा इतिहास हेच तर सांगतो .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:05 PM2018-02-07T17:05:03+5:302018-02-07T17:12:45+5:30
मानवाला माहीत असलेल्या सर्वात जुन्या कपड्यांची यादी केली तर त्यामध्ये स्कर्टचा नंबर दुसरा लागतो. स्कर्टचा वापर अगदी अश्मयुगीन काळापासून मानव करतो आहे. मात्र, मानवाप्रमाणेच स्कर्टचीही काळानुरूप जणू उत्क्रांतीच झाली आहे. स्कर्ट म्हणजे कधीही न संपणारी फॅशन आहे.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
स्कर्टच्या फॅन्स असलेल्या मुलींची संख्या अजिबातच कमी नाही. गेली कित्येक दशकं मुलींच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्ट आपलं असं हक्काचं स्थान टिकवून आहे.
स्कर्टची फॅशन नेमकी कधी आली याचा सहज शोध घेतला असता हा शोध थेट अश्मयुगापर्यंत जाऊन पोहोचला.
मानवाला माहीत असलेल्या सर्वात जुन्या कपड्यांची यादी केली तर त्यामध्ये स्कर्टचा नंबर दुसरा लागतो. स्कर्टचा वापर अगदी अश्मयुगीन काळापासून मानव करतो आहे. मात्र, मानवाप्रमाणेच स्कर्टचीही काळानुरूप जणू उत्क्रांतीच झाली आहे. आदिमानवाच्या काळात स्त्रिया आणि पुरूष दोघेही स्कर्ट वापरत असत. इजिप्शियन चित्रांमध्ये हा संदर्भ सापडतो. शेकडो वर्षांपूर्वी हे स्कर्ट पायघोळच असायचे. लुंगीवजा परंतु तरीही गुडघ्यापर्यंतच लांबी असलेले कापड कमरेभोवती गुंडाळून तत्कालिन मानव वावरत असे. कापडाचा शोध लागण्यापूर्वी तर चक्क प्राण्यांच्या कातडीचाच वापर आदीमानव कमरेखालचा भाग झाकण्यासाठी करीत असे. तेच स्कर्टचं प्राचिन रूप.
पोषाख परंपरेत जरा डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की जुन्या काळातील महिला नेहेमीच पायघोळ स्कर्ट वापरत. घरंदाज महिलांची श्रीमंती स्कर्टवरूनच ठरत असे हे विशेष. शिवाय स्कर्टच्या वापरामागे आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे स्त्रियांची कंबर आणि त्यावरून स्त्रिची शालीनता आणि सौंदर्य जोखलं जाई. अर्थात स्त्रीची कंबर जितकी बारीक तितकी ती अधिक सुंदर, घरंदाज अशी काहीशी धारणा तत्कालिन लोकांमध्ये होती असे काही संदर्भ सापडतात. आणि म्हणूनच स्कर्टचा, पायघोळ स्कर्टचा वापर घरंदाज महिला प्राधान्यानं करत.
काळ पुढे सरकत गेला तशी स्कर्टनंही आपली रूपं बदलली. तसंच, पुरूषांच्या पोषाखातून स्कर्ट नाहीसा झाला. अलिकडच्या काळात तर लांब, छोटा, मिनी, मायक्रो, गिंगहॅम, फ्लोरल, तलम, रॅप अ राऊण्ड असे कितीतरी प्रकार स्कर्टमध्ये आहेत. विशेष म्हणजे, या प्रत्येक प्रकाराला बाजारपेठेत तितकीच मागणी आहे. प्रत्येक प्रकारच्या स्कर्टचा चाहतावर्गही फार मोठा आहे.
स्कर्टबद्दल काही रंजक- मोहक
1. मानवाच्या पोषाख परंपरेतील सर्वाधिक वापरला गेलेला दुस-या क्रमांकावरचा पेहेराव म्हणजे स्कर्ट.
2. असं म्हणतात की सायकलचा शोध लागल्यानंतर महिलांनी स्कर्टला पर्याय म्हणून पॅण्टसचा वापर सुरू केला. कारण स्कर्ट घालून सायकल चालवणं फार अवघड होतं. सायकलच्या चाकात स्कर्ट अडकून फाटण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे स्कर्टला पर्यायी पोषाखाची गरज महिलावर्गामध्ये निर्माण झाली. आणि तेव्हापासून स्कर्टचा वापर कमी झाला.
3. पाश्चात्य देशांत महिला स्कर्टचा वापर प्राधान्यानं करतात.
4. स्कॉटलंड आणि आयर्लण्डमध्ये पुरूषांच्या पारंपरिक पोषाखात स्कर्टप्रमाणेच असलेला किल्ट हा पोषाख प्रकार प्रचलित आहे.
5. मुस्लीम संस्कृतीत इझार तर भारतीय संस्कृतीत लुंगी हे पोषाख साधारणत: स्कर्टशी साधर्म्य साधताना आढळतात.
6. अत्यंत ग्रेसफूल असे हे स्कर्ट आजच्या काळातही आपलं स्थान अढळ ठेऊन आहेत. शालेय गणवेशातही स्कर्टचा समावेश झाला आहे. याचं कारण म्हणजे ते वापरणं सोयीचं आहेच तसेच त्यामुळे महिलांच्या सौंदर्यात भरच पडते. त्यामुळे स्कर्टला आजही फार प्रचंड मागणी आहे आणि ती कायमच राहील !