स्टायलिश राहायला आवडतं मग ट्यूनिक ट्राय केलं का?
By admin | Published: July 12, 2017 05:19 PM2017-07-12T17:19:53+5:302017-07-12T17:19:53+5:30
झुळझुळीत तलम कपडा, असिमेट्री आणि बाह्यांचे आणि गळ्याचे अक्षरश: शेकडो प्रकार हीच या ट्यूनिकची खासियत आहे.
- मोहिनी घारपुरे देशमुख
लेगिन्स वा जीन्स दोन्हीहीवर खुलून दिसणारा कपड्याचा प्रकार म्हणजे ट्युनिक्स. हा एक प्रकारचा ढगळासा, स्लीव्हलेस आणि गुडघ्यांपर्यंत लांब असणारा कपड्याचा प्रकार आहे.
साधारणत: पूर्वी रोम आणि ग्रीसमध्ये या प्रकारचे कपडे स्त्रिया आणि पुरूष दोघेहीजण वापरत. लॅटीन भाषेत या प्रकारच्या कपड्यांना ‘ट्यूनिका’ असं म्हटलं जात. त्यावरूनच या प्रकाराला ‘ट्यूनिक’ असं नाव मिळालं.
खरंतर इतिहासात डोकावून पाहिलं तर याप्रकारचे कपडे आदिमानवानं वापरल्याचे दाखले मिळतात. 1830 च्या आसपास लहान मुलं ट्यूनिकवर बेल्ट वगैरे लावत असल्याचंही सापडतं. आधुनिक काळात मात्र धार्मिक अंगानेही ट्यूनिक्सचा वापर झाल्याचं दिसतं.
अलिकडे मात्र हे ट्यूनिक्स फॅशन जगतात इतके लोकप्रिय आहेत की यामध्ये प्रचंड प्रकार दिसून येतात. त्याचं ढोबळ स्वरूप, अर्थात पायाच्या गुडघ्यापर्यंत किंवा त्याहून उंचीला थोडेसे कमी आणि काहीसे ढगळे असंच असतं. मात्र, तरीही फॅशन डिझायनर्सनी या संपूर्ण सेगमेंटमध्येही बरेच प्रकार आणलेले आहेत.