घरातल्या, वॉलकम्पाउण्डच्या किंवा गच्चीवरच्या भिंतीवरही होवू शकतो ‘स्ट्रीट आर्ट’चा अविष्कार. घराला सजवण्याचा हा एक आणखी नवा ट्रेण्ड !
By admin | Published: July 13, 2017 04:37 PM2017-07-13T16:37:47+5:302017-07-13T16:37:47+5:30
घराच्या भिंतींना पर्सनलाईज्ड, सिग्नेचर लूक देण्यासाठी स्ट्रीट आर्ट ट्रेण्ड झपाट्यानं लोकप्रिय होतोय.
- सारिका पूरकर- गुजराथी
मध्यंतरी नाशिक शहरातील उड्डाणपुलाखालील भिंतींवर सुंदर चित्रं रेखाटून निरुपयोगी, दुर्लक्षित आणि त्यामुळे गुटख्याच्या पिचकाऱ्यांच्या बळी ठरलेल्या भिंतींना नवं रुप देण्यात आलं होतं. स्ट्रीट आर्टचा हा प्रयोग नाशिकमध्येच करण्यात आलेला नसून जगभरात तो खूप लोकप्रिय आहे. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये स्ट्रीट आर्टचा आविष्कार सध्या मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. आत्तापर्यंत स्ट्रीट आर्टचा प्रयोग फक्त प्रमुख परिसरातील भिंती, शाळांच्या भिंती यावर सुंदर चित्रं सामाजिक संदेश, शैक्षणिक आशय रेखाटण्यासाठी होताना दिसत होता, आता मात्र स्ट्रीट आर्टनं आपल्या घरात प्रवेश केलाय. होय, घराच्या भिंतींना पर्सनलाईज्ड, सिग्नेचर लूक देण्यासाठी स्ट्रीट आर्ट ट्रेण्ड झपाट्यानं लोकप्रिय होतोय. चारचौघांपेक्षा आपलं घर काहीसं हटके दिसावं, त्यात स्वत:चं असं वेगळेपण दिसावं याकरिता या स्ट्रीट आर्टद्वारे घराच्या भिंती सजवल्या जात आहेत.
नव्या ट्रेण्डवर पसंतीची मोहोर
स्ट्रीट आर्टचा वापर इंटिरिअरसाठी वेगानं लोकप्रिय होतोय. आर्ट आॅन द वॉलच्या क्रितिका महिंद्रा यांनी सांगितलंय की, ‘स्ट्रीट आर्ट आर्टिस्ट्सना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतोय आणि गेल्या चार वर्षात घरातील भिंतीवर स्ट्रीट आर्ट साकारण्याचा ट्रेण्ड खूप हिट झालाय. आत्तापर्यंत आम्ही ७० हून अधिक घरातील भिंतीवर ही कला साकारली आहे. प्रत्येकाला आपल्या घराला कस्टमाईज्ड लूक हवा आहे आणि त्यासाठी स्ट्रीट आर्ट हा बेस्ट आॅप्शन ठरत आहे.