​उबदार कपड्यांनी बना स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 05:56 PM2016-11-23T17:56:43+5:302016-11-23T17:56:43+5:30

हिवाळा ऋतू सुरु झाला असून, थंडीचे प्रमाणही वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी विविध प्रकारचे उबदार कपडे परिधान करीत असतात.

Stylish made with warm clothes | ​उबदार कपड्यांनी बना स्टायलिश

​उबदार कपड्यांनी बना स्टायलिश

Next
ong>-Ravindra More

हिवाळा ऋतू सुरु झाला असून, थंडीचे प्रमाणही वाढले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी विविध प्रकारचे उबदार कपडे परिधान करीत असतात. बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट न होणारे कपडे निवडले जातात आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ हा एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या सदरात फॅशनेबल दिसण्यासाठी कोणत्या उबदार कपड्यांची निवड करायची याबाबत जाणून घेऊया...

डिसेंबर ते फेबु्रवारी दरम्यान बरेच दिवस हवेत सुखद गारवा आणि मस्त गुलाबी थंडी असते. या बोचणाऱ्या थंडीची दखल उबदार कपड्यांच्या बाजारपेठेने घेतली आहे. या बाजारपेठेत कमी ऊब देणारे परंतु फॅशनेबल कपडे बाजारात उपलब्ध आहेत. नैसर्गिक गारठ्यापेक्षा कॉर्पोरेट विश्वातील वातानुकूलित कक्षात वावरताना अशा कपड्यांचा खूप उपयोग होतो..

थंडीच्या दिवसात इच्छा नसतानाही शाळा-महाविद्यालय, नोकरी यानिमित्ताने पहाटे घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी उबदार कपड्यांची आवश्यकता असते. अनेकजण याच काळात बाजारात, रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या तिबेटीयन अथवा नेपाळी विक्रेत्यांकडून स्वेटर्स विकत घेतात. त्याचप्रमाणे शोरूम्समधील ब्रॅण्डेड उबदार कपडेही खरेदी केले जातात. आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार त्यापैकी योग्य दुकानावर आपली नजर स्थिरावते आणि आवडीनुसार जॅकेट्स विकत घेतली जातात. वॉर्म जॅकेट्स, टी-शर्ट, शॉल आदींचे अनेक प्रकार आपल्याला स्ट्रीट मार्केटमध्ये पाहायला मिळतात. सध्या बाजारात अनेक प्रकारचे कोट आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारांत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निवड करताना संभ्रमात पडायला होते. कोणत्या ग्राहकाला कोणते जॅकेट प्राधान्याने दाखवावे, हा प्रश्न विक्रेत्यासमोर नेहमीच उभा राहतो. जॅकेट निवडीच्या वेळी होणारा संभ्रम टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. 

शहरातील बहुतांश भागात नेपाळी, तिबेटीयन तसेच स्थानिक स्वेटर्स विक्रेते रस्त्यावर रंगीबेरंगी स्वेटर्सचा ढीग मांडून बसतात. त्यांना पाहिले की ऋतू बदलाची जाणीव होते. मेघालय, पंजाब, नेपाळ येथील माल ते विक्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आणतात. सुमारे ५०० ते हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारांतील स्वेटर्स त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यात लोकरीच्या स्वेटरपासून जर्कीन, जॅकेट, कानटोपी, लहान मुलांचे स्वेटर्स असे ऊबदार कपडे विक्रीसाठी असतात.

पी जॅकेट / पायलेट जॅकेट
यालाच पी कोट असेही म्हणतात. हे साधारणत: नेव्ही ब्लू रंगामध्ये पाहावयास मिळते. पी जॅकेट परिधान केल्यानंतर मनुष्याचा लूक राजेशाही थाटासारखाच दिसतो. विशेषत: याला लांब बाह्या असतात. तर त्याची कॉलर रुंद असते. पी कोटचा आकार त्याच्या डिझाईननुसार बदलतो. पुरुष आणि महिला या दोघांसाठी पी कोट उपलब्ध आहेत. सुरुवातीला युरोपातील खलाशी नंतर काही कालावधीनंतर अमेरिकन खलाशी याचा वापर करीत होते. 

बहुरंगी वुलन टी-शर्टस
बाह्य वातावरणात थंडीचा गारवा आणि कंपनींच्या कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा यामुळे हुडहुडी भरविणाऱ्या थंडीच्या बचावासाठी वुलन टी-शर्टसना चांगली पसंती मिळते. यात ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात बहुरंगी टी-शर्टस बाजारात उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे टी-शर्ट एक प्रकारचे स्वेटरच असतात. मात्र यामध्ये स्वेटर्सच्या तुलनेत कमी ऊब मिळते.  

उबदार पार्का कोट
हिवाळ्यात थंडीचे प्रमाण जास्त असेल तर पार्का कोट्सला पसंती दिली जाते. कारण यापासून इतरांपेक्षा सर्वाधिक उब मिळते. पार्का कोट्स लांबीला मांडीपर्यंत येतात तर याला लांब बाह्या असतात. त्यामुळेच आपल्या शरीराचा बहुतेक भाग या जॅकेटमुळे झाकला जातो. पार्का कोट्सला पुढच्या बाजूला झिप असते आणि मागच्या बाजूला हूड (डोक्यासाठी टोपी) असते, त्यामुळे या जॅकेट्सला तरुणाईची विशेष पसंती मिळताना दिसते.  

लेदर जॅकेट्स
कित्येक वषार्पासून तरुणाईला वेड लावणारे लेदर जॅकेट्सची क्रेझ तेवढ्याच प्रमाणात आजही पाहावयास मिळते. कित्येक हिंदी चित्रपटांमध्ये बॉलिवूड कलाकारांनी जॅकेट्स वापरले आहे. साहजिकच याचे अनुकरण तरुण मंडळी करतात. भरपूर खिसे, स्ट्रेट किंवा फिटेड कट, विविध प्रकारच्या कॉलर्स अशा विविध वैशिट्यांमुळे हे जॅकेट्स परिधान केल्यानंतर प्रत्येकाचा लूक फॅशनेबल बनतो, हे नक्की

Web Title: Stylish made with warm clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.