स्टायलिश करिअरचा स्टायलिश मार्ग
By admin | Published: June 16, 2017 01:46 AM2017-06-16T01:46:04+5:302017-06-16T01:46:04+5:30
केशरचनाकार (हेअर ड्रेसर) आणि रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) हे एकेकाळी नाभिक समाजापुरते मर्यादित असलेले व्यवसाय आता जगासाठी खुले झाले आहेत.
केशरचनाकार (हेअर ड्रेसर) आणि रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) हे एकेकाळी नाभिक समाजापुरते मर्यादित असलेले व्यवसाय आता जगासाठी खुले झाले आहेत. कौशल्य विकासाची जोड मिळाल्याने जाती-धर्मापलीकडे जाऊन तरुण आणि तरुणी या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. सौंदर्य प्रसाधनातील नामांकित कंपन्यांनी या क्षेत्रात शिरकाव केल्याने प्रत्येक शहरात हेअर ड्रेसिंग आणि ब्युटिशियनचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या तरुणाईला या क्षेत्रात आता नावासोबतच चांगला पैसाही मिळू लागला आहे. त्यामुळे सध्यातरी हेअर स्टायलिस्ट आणि ब्युटिशियनचे ‘अच्छे दिन’ सुरू असल्याचे म्हणता येईल.
- तुषार चव्हाण, हेअरस्टायलिस्ट, संचालक : तुषार नॅशनल हेअर फॉर ब्युटी अॅकॅडमी
सर्टिफिकेशनसाठी असोसिएट आॅफ ब्युटीथेरपी अॅण्ड कॉस्मेटॉलॉजी (इंडिया) हे जनरल अॅस्थेटिक्ससाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. सिडेस्को सर्टिफिकेशन फ्रॉम झुरीच ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. त्यासोबत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल ही सरकारची संस्था आहे. यातील सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्राशी निगडित असलेली संस्था म्हणजे ब्युटी अॅण्ड वेलनेस सेक्टर स्कील कौन्सिल होय. या दोन्ही संस्था सरकारमान्य अभ्यासक्रम चालवतात.
ब्युटी थेरपी/ब्युटी कल्चर
हा अभ्यासक्रम या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवात असते. या अभ्यासक्रमानंतर तुम्ही एखाद्या ब्युटीपार्लरमध्ये ब्युटीशियन म्हणून काम करू शकता. या अभ्यासक्रमात सौंदर्य खुलवण्याच्या प्रक्रिया शिकवल्या जातात. त्यात थे्रडींग, वॅक्सींग, क्लीनअप, फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
हेअर ड्रेसिंग/हेअर कटिंग
या अभ्यासक्रमात केशरचना शिकवली जाते. हा अभ्यासक्रम साधारणत: एक ते दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण होतो. या अभ्यासक्रमात पुरुष आणि महिला असे दोहोंचे हेअर कटिंग शिकवले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना देशी किंवा परदेशी युनिसेक्स सलुनमध्ये ‘हेअर स्टायलिस्ट’ म्हणून जॉब करता येतो.
कुठे शिकाल?
हेअर कटिंग/ हेअर ड्रेसिंगसाठी संस्था :
भारतात हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बऱ्याच अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी संस्था आहेत. त्यात गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, तुषार नॅशनल हेअर फॉर ब्युटी अॅकॅडमी, एलटीए स्कूल आॅफ ब्युटी, इंटरनॅशनल सोसायटी आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी अशा विविध संस्थांचा समावेश आहे.
मेकअप आर्टिस्ट
या अभ्यासक्रमात चेहऱ्यावरील सौंदर्य कसे खुलवायचे? आणि चेहरा कसा असावा? हे शिकवले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला साधारण सहा महिने लागतात. त्यानंतर सतत सराव करून प्रशिक्षणार्थी कुशल रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) होऊ शकतात. या अभ्यासक्रमानंतर चित्रपटसृष्टी किंवा स्वत:चा व्यवसाय करता येतो.
छोट्या कोर्सेसमधून मोठी कमाई
डिप्लोमा कोर्सेससोबत प्रोफेशनल ब्युटी थेरपी आणि ब्युटी कल्चर, प्रोफेशनल हेअर ड्रेसिंग आणि केमिकल थेरपी, मेकअप आणि हेअर स्टायलिंग हे सर्व अभ्यासक्रम ३ महिने,
६ महिने आणि एक वर्ष कालावधीचे आहेत. या छोटेखानी कोर्सेसमधूनही मोठ्या कमाईची संधी विद्यार्थ्यांना मिळते. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही हे कोर्सेस करता येतात.