सुश्मिताचा बिनामेकअप फोटो आणि आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड
By admin | Published: July 10, 2017 05:10 PM2017-07-10T17:10:33+5:302017-07-10T17:11:29+5:30
सुश्मिता सेननं मेकप नसलेला फोटो इन्स्टाग्रामवर काय टाकला त्याची नेटीझन्समध्ये प्रचंड चर्चा झाली. त्याचं कारण आहे सोशल मीडीयावरचा नवा आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड.
-निशांत महाजन
सुश्मिता सेननं मेकप नसलेला फोटो इन्स्टाग्रामवर काय टाकला त्याची नेटीझन्समध्ये प्रचंड चर्चा झाली. इतकी चर्चा की, सुश्मिता कुठला व्यायाम करते, कुठली क्रीम लावते, काय डाएट करते वगैरे. का? तर तिनं मेकप न केलेला आपला फोटो समाजमाध्यमांत टाकला. आणि त्यात ती अप्रतिम सुंदर दिसत होती. खरंतर रजनीकांत मेकअप न करता मस्त राजरोस फिरतात. आणि तरी त्यांचे फॅन्स त्यांच्या त्याही रुपावर जीव ओवाळून टाकतात. तर मग सुश्मिताच्या याच फोटोची एवढी चर्चा होण्याचं काय कारण असेल? त्याचं कारण आहे सोशल मीडीयावरचा नवा आॅनेस्टी नावाचा ट्रेण्ड.
खरं तर सोशल मीडीयात कधी काय क्लिक होईल आणि कशाची हवा होईल हे सांगताच येत नाही. पण गेले काही दिवस सोशल मीडीयात एक नवा ट्रेण्ड आहे.
त्याचं नाव आहे आॅनेस्टी इज ट्रेण्डिंग.
म्हणजे काय तर जे जे खरं वाटेल, खरं असेल, प्रामाणिकपणे कबूल केलेलं असेल, पर्सनली खरंखुरं, बरंवाईट मांडलेलं असेल ते ट्रेण्ड होतं.
तुम्ही साधं उदाहरण घ्या.
आपल्या एखाद्या मित्रानं सेण्टी होत सांगितलेला त्याचा खराखुरा किस्सा आपण चवीनं वाचतो. कुणाची लाइफस्टोरी, कुणाचा स्ट्रगल, कुणाचा कॅमेराला पोज न देता काढलेला फोटो, एखाद्यानं पोज न घेता शेअर केलेला अनुभव, कुणाची तरी उत्सफुर्त कमेण्ट हे सारं आपण फार मन लावून वाचतो.
आपण म्हणजे आपण सगळेच.
जे जे दिलसे लिहिलेलं, व्यक्त केलेलं, फोटो काढून मांडलेलं असेल ते आताशा सोशल मीडीयात क्लिक होताना दिसतं आहे. कारण तेच, तिथं चकाकणारे फोटो, कचकडी उसन्या शब्दांचे रतिब रोजच चालू असतात. त्या उसन्या शब्दांना आणि खोट्या उमाळ्यांना कुणी विचारत नाही. कारण त्यातलं फोफसेपण सगळ्यांनाच कळून चुकलंय.
त्यापेक्षा जे जसं आहे तसं पाहणं, स्वीकारणं आणि त्यातलं अस्सल असणं, रॉ असणं अधिक आकर्षक वाटू लागलं आहे.
सुश्मिताचा बिनामेकअप फोटो कसला भारी आहे हे सांगताना आपल्याला हे माहिती असलेलं बरं!