टीममधला सगळ्यात कच्चा लिंबू कोण?-आपण तर नाही??
By admin | Published: July 14, 2017 05:17 PM2017-07-14T17:17:51+5:302017-07-14T17:17:51+5:30
प्रत्येक टीममध्ये एक कच्चा गडी असतो, पण तो म्हणजे आपण नाही हे कसं ओळखायचं?
-निशांत महाजन
सगळीकडे सध्या ले-आॅफची, मनुष्यबळ कपातीची चर्चा आहे. जॉब्ज जाताहेत, आॅटोमेशनमध्ये रोजगार संधी कमी होण्याची शक्यता आहे असं आपण सारं ऐकतो. आणि धास्तावतो. मात्र आपल्या कंपनीत, आपल्या टीममध्ये जेव्हा उत्तम मनुष्यबळाची चर्चा होते, टॅलेण्टेड माणसाची गिनती होते तेव्हा त्यात आपला समावेश होतो का? त्याउलट कच्चा लिंबू, जेमतेमच आहे म्हणून मॅनेजमेण्ट आणि बॉस आपल्याकडे पाहतात? आत्मपरिक्षणच करायचं तर हे प्रश्न अवघड आहेत. कारण आपण आपलं काम मनापासून, चोख करत असतो. नवीन काही शिकत असतोच. मात्र तरीही जर ‘विक’ किंवा ‘कच्चा’ म्हणून जर कंपनी आपल्याकडे पाहत असेल आणि विकेट काढायची वेळ आलीच तर ती आपल्यावर येऊ शकते असं आपल्याला वाटत असेल तर ते गंभीर आहे. म्हणूनच आपण तो कच्चा लिंबू तर नाही ना, हे आपण तपासून पहायला हवं. ते कसं ओळखायचं याची ही एक छोटीशी टेस्ट आहे. आपली आपण करुन घेतलेली बरी, ती ही नियमित.
१) जेव्हा जेव्हा कंपनीत नवीन प्रोजेक्ट सुरु होतो, तेव्हा त्यात आपल्या नावाचा विचार होतो का? होत नसेल तर समजा की, आपण विक आहोत.
२) जेव्हा एखादी महत्वाची असाईनमेण्ट द्यायची असेल तेव्हा बॉसची पहिली चॉईस आपण असतो का? नाही? तर मग समजा की, आपण विक आहोत.
३) कुठलंही नवीन काम आलं, तर आपण स्वत:हून त्यात रस घेतो की काय आता डोक्याला ताप असा आपला अॅटिट्यूड असतो. आपण नाक मुरडत असू तर समजा की आपण विक आहोत.
४) आपण कामाचा कमी, त्यातल्या उत्तम गुणवत्तेचा कमी आणि पगाराचा जास्त विचार करत असू तर समजा की आपण विक आहोत.
५) नवीन स्किल्स आपल्याला येतात का? आपल्याला कॉन्फिडन्स आहे की, की काय वाट्टेल ते झालं तरी आपण नव्या काळातही टिकून राहू, तो असेल तर उत्तम. नसेल तर समजा की, आपण अत्यंत कच्चे आहोत आणि आपली विकेट कधीही जाऊ शकते.