केसांना तेल लावणं का आवश्यक असतं?
By admin | Published: June 16, 2017 01:52 PM2017-06-16T13:52:47+5:302017-06-16T13:53:16+5:30
अनेकजण केसांना तेल लावतच नाहीत, त्यानं नक्की काय बिघडतं?
- पवित्रा कस्तुरे
केसांना रोज तेल लावावं का? लावावं की नाही? लावले तर फायदे काय? तोटे कोणते? असे वाद अनेक. कुणी काय सांगतं तर कुणी काय? रोज वेगळे अभ्यास आणि वेगळी माहिती समोर येते. त्यात अनेकजण असे की रोज तेल चोपडतात. काहीजण महिनोंमहिने केसांना तेलच लावत नाहीत. यातलं खरं काय, खोटं काय , काहीच कळत नाही. मात्र आपल्या पारंपरिक शहाणपणावर जायचं तर आपली आजी, आई रोज तेल लावत असत. लहान मुलांना रोज तेल मालीश करतात. डोक्यावर तेल थापतात. त्या समजुतीवर विश्वास ठेवला तर केसांना नियमित तेल लावण्याचे काही फायदे आहेत.
१) केसांना रोज तेल लावलं तर केस लवकर पांढरे होत नाहीत. अर्धवट पांढरे होत नाहीत.
२) केस गळण्याचं, तुटण्याचं, त्यांना तोंड फुटण्याचं प्रमाण कमी होतं.
३) डोकं शांत राहतं. गाढ झोप लागते. डोकेदुखीचा त्रास वारंवार होत नाही.
४) केस मजबूत तर राहतात, पण केसांच्या मुळांना सतत खाद्य मिळत राहिल्यानं केसांची वाढही चांगली होते.
५) केसांत कोंडा होण्याचं प्रमाण कमी होतं. पण कोंडा फार असल्यास केसांना तेल लावण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम. नाहीतर कोंडा चेहऱ्यावर गळून चेहरा खराब होण्याची, पिंपल्स होण्याची शक्यता असते.
६) केस मऊ होतात. त्यांचा पोत सुधारतो.
७) मुळात ज्यांची ड्राय स्किन असेल, त्यांनी तर केसांना रोज तेल लावणं उत्तम.
८) केस सतत धुवू नये. आणि नहाण्यापूर्वी केसांना तेल लावणं उत्तम.
९) केसांना खोबरेल तेल लावताना त्यात जास्वंदाचा वापर उत्तम.
१०) केस वाढवायचे असतील नसतील, केसांना तेल लावत राहिलं तर तळपायाची आग कमी होते असं एक निरीक्षण आहे.