यांनी घडविले शून्यातून विश्‍व..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:39+5:302016-02-06T08:13:36+5:30

ते श्रीमंत आहेत आणि विख्यातही आहेत. ते अशा पद्धतीने जीवन जगतात की आपणासही हेवा वाटेल.

The world was created by the sun. | यांनी घडविले शून्यातून विश्‍व..

यांनी घडविले शून्यातून विश्‍व..

Next
श्रीमंत आहेत आणि विख्यातही आहेत. ते अशा पद्धतीने जीवन जगतात की आपणासही हेवा वाटेल. मात्र प्रत्येक जण चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला नसतो. त्यांची पार्श्‍वभूमीही खूपशी चांगली नाही. त्यांच्या पाठीशी राजकीय शक्ती नाही, ज्यांच्या शिडीचा आधार घेऊन ते वर चढू शकतील. अशाच काही श्रीमंतांचा आढावा या ठिकाणी घेत आहोत. ही त्यांच्या यशाची गाथा आहे. यापासून नक्कीच प्रेरणा मिळू शकेल. पाँटी चढ्ढा
रस्त्याच्या कडेला स्नॅक्स विकण्यापासून सुरुवात केलेल्या आणि सुमारे ८000 कोटींच्या संपत्तीचे साम्राज्य उभ्या करणार्‍या गुरुदीप सिंग चढ्ढा उर्फ पाँटी चढ्ढा यांची कथा खूपच सुरस आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे जन्मलेले पाँटी हे दारुच्या दुकानासमोर उभे राहून स्नॅक्स विकत होते. नियोजनबद्ध व्यवसायाने लवकरच ते उत्तर प्रदेशातील मद्य व्यवसायात अग्रगण्य झाले. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट, साखर, चित्रपट निर्मिती आणि विक्रीमध्ये आपले पाय पसरले. सप्टेंबर २0१२ साली झालेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये त्यांच्या वेव्ह ग्रुपने दिल्लीचा संघ विकत घेतला. आपल्या भावांसोबत त्यांनी चढ्ढा ग्रुपची स्थापना केली. वेव्ह ब्रँडच्या नावाखाली त्यांनी आपले पंख पसरले. राष्ट्रीय राजधानीमध्ये मल्टीप्लेक्सची साखळी निर्माण केली. २0१२ साली त्यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांची संपत्ती १0,000 कोटी इतकी होती.
डॉ. सुभाष चंद्रा
डॉ. सुभाष चंद्रा यांना भारतीय माध्यमांचे बादशहा, व्यावसायिक, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी, प्रेरक वक्ता आणि परोपकारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. भारतामधील सर्वात मोठय़ा झी मीडिया या टी. व्ही. चॅनल नेटवर्कचे आणि एसेल ग्रुपचे ते चेअरमन आहेत. पिठाची गिरणी चालक ते भारतीय माध्यमांचे बादशहा अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे. २९ ऑक्टोबर २00२ पासून ते झी टेलिफिल्म्स् लिमिटेडचे ते कार्यकारी संचालक आहेत. एस्सेल ग्रुप ऑफ कंपनीजचे ते प्रवर्तक आहेत. त्यांच्या उद्योगात टेलिव्हिजन नेटवर्क, मनोरंजन, केबल सिस्टीम, सॅटेलाईट कम्युनिकेशन, थीम पार्क, पॅकेजिंग, कौटुंबिक मनोरंजन केंद्रे आणि ऑनलाईन गेम यांचा समावेश आहे.
मोहन सिंग ओबेरॉय
शिमल्याच्या द सेसिल हॉटेलमध्ये महिन्याला ५0 रुपयाच्या पगारावर बिलिंग क्लर्क म्हणून कामास सुरुवात केलेल्या ओबेरॉय यांनी भारतामधील अलिशान अशा ओबेरॉय हॉटेल्सचा ग्रुप तयार केला. मोहनसिंग ओबेरॉय यांची कथा खूपच जबरदस्त आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायात भारतात जागृती निर्माण होण्यापूर्वी या युवा किशोरवयीन मुलाने हॉटेल फ्लॅशमन सुरू केले. रावळपिंडीमध्ये याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉटेल्सची उभारणी केली. सात देशात त्यांची ३५ हॉटेल्स आहेत. देशात हॉटेल्सचे जाळे उभे करणारे ते पहिले उद्योजक होते.
गुलशन कुमार
जेव्हा जेव्हा भारतीय संगीत उद्योगाचे नाव येते, त्यावेळी गुलशन कुमार यांचे नाव अग्रभागी असते. टी-सीरीजचे ते संस्थापक होते. प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांचे नाव कोरले आहे. चंद्रभान यांचे पुत्र म्हणून गुलशन एका सामान्य पंजाबी कुटुंबात जन्माला आले. दिल्लीतील दरियागंज भागात ते फळांचा रस विकत होते. नंतर त्यांनी कारकीर्द वेगळ्या क्षेत्रात सुरु केली. रेकॉर्ड आणि जुन्या ऑडिओ कॅसेट विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर त्यांनी संगीत उद्योगात पाऊल ठेवले. सुपर कॅसेट इंडस्ट्रीज नावाने त्यांनी स्वत:ची कॅसेट कंपनी काढली.
कुंवर सचदेवा
पेन, स्टेशनरी विकण्यापासून सुरुवात केलेल्या कुंवर सचदेवा यांनी इन्व्हर्टरउद्योगात पाऊल ठेवले. त्यांचा प्रवास अडखळता आणि विविध वळणांचा आहे. सु-कॅम पॉवर सिस्टीम या इन्व्हर्टर विक्री करणार्‍या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणार्‍या कुंवर यांनी उत्पादक, विक्री क्षेत्रात नाव कमावले. प्रेरणादायी व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. जगातील ९0 देशात त्यांचा ब्रँड विकला जातो.

Web Title: The world was created by the sun.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.