शरीर आणि मनाला आनंद आणि आराम देणारी आपल्या देशातली ही 5 स्पा सेंटर तुम्हाला माहिती असायलाच हवीत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:19 PM2017-08-23T19:19:28+5:302017-08-23T19:30:03+5:30
स्पा ट्रीटमेण्टमुळे केवळ शरीरच नव्हे तर मनालाही चांगलीच विश्रांती मिळते. त्यामुळे नव्या उर्जेनं तुम्ही परत कामाला सुरूवात करता. म्हणूनच आपल्या देशातली खास स्पा ट्रीटमेण्टसाठी म्हणून प्रसिद्ध असलेली काही ठिकाणं ही तुम्हाला माहिती असायलाच हवीत.
- अमृता कदम
सध्याच्या काळात प्रवासाचे ट्रेण्ड बदलत चालले आहेत. केवळ मनालाच नाही तर शरीरालाही रिलॅक्स करण्यासाठी अनेकजण प्रवासाला निघतात. त्यातून योगा थेरपी, आयुर्वेदिक उपचार, रेकी थेरपीसाठीही ट्रीप प्लॅन केली जाते. त्यात आता भर पडली आहे स्पा ट्रीटमेण्टची. स्पा ट्रीटमेण्टमुळे केवळ शरीरच नव्हे तर मनालाही चांगलीच विश्रांती मिळते. त्यामुळे नव्या उर्जेनं तुम्ही परत कामाला सुरूवात करता. म्हणूनच आपल्या देशातली खास स्पा ट्रीटमेण्टसाठी म्हणून प्रसिद्ध असलेली काही ठिकाणं ही तुम्हाला माहिती असायलाच हवीत.
झेहेन, द मॅनॉर ( दिल्ली)
दिल्ली हे देशातलं सगळ्यात स्टायलिस्ट शहर आहे. त्यामुळेच स्वत:ची काळजी घेण्यासाठी आवश्यक अशा सर्वोत्तम सुविधा इथे मिळतात. त्यांपैकीच एक म्हणजे हे स्पा सेंटर. राजधानीतलं हे स्पा सेंटर दोन भागात विभागलेलं आहे. तळमजला हा आंतरराष्ट्रीय मसाज थेरपीजचा आहे तर दुसरा मजला अधिकृत आयुर्वैदिक उपचारपद्धतीचा. इथे आल्यावर थेट हा दुसरा मजला गाठा. हा मजला अतिशय सुंदर अशा बगीच्यानं सजवलेला आहे. अभ्यंग पात्र पोटली हा केरळच्या प्रसिद्ध आयुर्वेद थेरपीमधला एक अधिकृत प्रकार इथे अनुभवता येतो. 90 मीनिटांच्या या थेरपीची सुरूवात ‘फुल बॉडी आॅईल मसाज’नं होते. त्यानंतर उबदार आयुर्वेदिक औषधींनीयुक्त तेलाचा हात फिरवला जातो. ही ट्रीटमेण्ट तुम्हाला अत्यंत निवांतपणाचा फील देते. शिवाय पाठदुखी, सांधेदुखी, स्नायू अखडण्यासारख्या त्रासांवर हा रामबाण उपाय आहे. मसाज झाल्यानंतर थोड्या वेळानं गरम पाण्याचा शॉवर घेऊन तुम्ही आल्याच्या कडक चहाचा आस्वादही इथे घेऊ शकता. शिवाय त्यानंतर इथल्या प्रायव्हेट डायनिंगरु ममध्ये प्रख्यात शेफ मनिष मेहरोत्रा यांच्या स्पेशल आयुर्वेद थाळीचा आस्वादही घेऊ शकता. बाकी इतर मसाज प्रकारही इथे उपलब्ध असले तरी अभ्यंग पात्र पोटली ही या स्पाची एकदम खासियत.
कैराली- आयुर्वैदिक हिलिंग व्हिलेज, पलक्कड(केरळ)
पारंपरिक आयुर्वैदिक उपचार पद्धती आणि औषधी तेलांचा मिश्रण असलेली थेरपी अनुभवण्यासाठी कैराली स्पा सेंटरला एकदातरी भेट देणं आवश्यक आहे. तब्बल 60 एकरांच्या नितांत सुंदर परिसरात वसलेलं हे ठिकाण. शिवाय तुमच्या राशीनुसार तुमचं निवासस्थान निवडण्याची एक अनोखी पद्धत इथे पाहायला मिळते. पोटाचा घेर वाढलेल्यांना चरबी कमी करायची असेल तर इथलं वेटलॉस पॅकेज अतिशय योग्य. यामध्ये नियंत्रित आयुर्वैदिक शाकाहारी डाएट, मसाजचं योग्य वेळापत्रक आखलं जातं. इथला हॉट शॉवर बाथही आयुर्वेदिक औषधीनं युक्त असतो. जो तुमच्या शरीरात नव्यानं चरबी साठू देत नाही. 14 ते 28 दिवसांच्या पॅकेजमधे इथे स्पा थेरेपी उपलब्ध आहे.
वाइल्डफ्लॉवर हॉल, शिमला इन हिमालयाज, ओबेरॉय रिसॉर्ट ( शिमला)
शिमल्यातल्या या स्पा सेंटरची भेट ही तुमच्या शरीरासह डोळ्यांनाही थंडावा देते. हिमालयाच्या कुशीत, पाईन वृक्षांच्या घनदाट सान्निध्यात वसलेल्या या हॉटेलचा परिसर बघताक्षणी तुम्हाला मन:शांतीची अनुभूती देतो. या हेरिटेज हॉटेलमध्ये तुम्हाला मसाज, बॉडी स्क्र ब, फ्लोरल बाथसारख्या अनेक ट्रीटमेण्टस उपलब्ध आहेत. एका निष्णात प्रशिक्षकासह तुम्हाला योगा सेशनही उपलब्ध करून दिले जातात. ‘साऊंड अॅण्ड व्हायब्रेशन’ प्रकारातली स्पा ट्रीटमेंट ही या हॉटेलची खासियत आहे. तिबेटियन गाण्यांचा आवाज, हिमालयाची पाशर््वभूमी आणि सोबत ही थेरपी तुमच्या शरीराला पिसासारखं हलकं करते. तब्बल 3 तास ही थेरपी दिली जाते.
द तमारा, कुर्ग ( कर्नाटक)
तमारा या हिब्रू शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. आनंद आणि पारंपरिक मूल्यं या दोन्हींचा संगम कर्नाटकच्या कुर्गमध्ये वसलेल्या या स्पामधे तुम्हाला पाहायला मिळेल.एका जुन्या पण आकर्षक बांधकामाच्या बंगल्यात, सुंदर वृक्षांच्या सान्निध्यात हे स्पा सेंटर वसलेलं आहे. आयुर्वेद आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्पा थेरपी इथे उपलब्ध आहेत. शिवाय इथले थेरपिस्ट अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत. या स्पा सेंटरची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे कॉफी थेरपी. कर्नाटकच्या या परिसरातच उत्तम प्रकारच्या कॉफीचं उत्पन्न होतं. त्यामुळे हे अगदी समर्पक संशोधन आहे. कॉफी बियांचा, नैसर्गिक अॅण्टीआॅक्सिडण्टशी योग्य मिलाप करु न ही थेरपी दिली जाते. ज्यामुळे तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स, ताण, थकवा सगळं दूर होण्यास मदत होते. कॉफी स्क्र बचा हळुवार मसाज त्वचेला तजेला देतो. 120 मीनिटांची ही थेरेपी आहे.
आनंदा, ऋषिकेश
उत्तराखंडच्या ऋ षिकेशमध्ये वसलेलं हे स्पा सेंटर. तुमचं शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि आरोग्य जागरूकतेबाबत श्रीगणेशा करण्यासाठी सर्वांत उत्तम ठिकाण. शरीरातली चरबी कमी करण्यासाठी अगदी नियोजनबद्धतेनं सुरूवात करु न नंतर स्पेशल डाएट, डिटॉक्सिफायिंग स्क्र ब, बॉडी मास्क असे विविध प्रकार इथे करून घेतले जातात. योगिक स्पा, वेटलॉस किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट यातला कुठलाही पर्याय निवडलात तरी तुम्हाला तब्बल 80 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी आणि ब्युटी ट्रीटमेण्टस इथे दिल्या जातात. अर्थात त्यासाठी कमीत कमी पाच रात्रींचा मुक्काम तरी इथे आवश्यक आहे.
प्रवासाकडे पाहण्याचा साचेबद्ध दृष्टिकोन बदललात तर प्रवास करण्याची वेगवेगळी कारणं तुम्हाला सापडतील. आणि ख-याअर्थानं तुमच्या मनाच्याच नाही तर शरीराच्या आरोग्यासाठीही तुमचा प्रवास उपयोगी ठरेल.