या घरगुती वस्तू खुलवतील तुमचे सौंदर्य
By admin | Published: July 13, 2017 02:16 AM2017-07-13T02:16:04+5:302017-07-13T02:16:04+5:30
पुडिंग किंवा सॉससारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी स्वयंपाकघरात आरारूट पावडरचा वापर केला जातो
आरारूट पावडर - पुडिंग किंवा सॉससारखे पदार्थ घट्ट करण्यासाठी स्वयंपाकघरात आरारूट पावडरचा वापर केला जातो. मात्र, ही हलकी पांढऱ्या रंगाच्या पावडरमध्ये जखमा बऱ्या करण्याच्या गुणधर्म आहे. त्याशिवाय खरबरीत त्वचा व त्वचेवरच्या डागांवरच्या उपचारांसाठीही हे अत्यंत उपयुक्त आहे. आरारूट पावडर कोको पावडरसह मेकअप फाउंडेशन म्हणून वापरतात. तसेच कोरडा शॅम्पू म्हणूनही आरारूट पावडर वापरता येईल.
टोमॅटो - टोमॅटोचा अर्क नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतो. त्यामुळे त्वचेच्या खुल्या रंध्रांचा आकार कमी होतो आणि तुम्हाला तरुण, तजेलदार, चमकदार त्वचा मिळते. एक-दोन चमचे टोमॅटो रस घ्या. तो तुमच्या चेहऱ्यावर कापसाच्या बोळ्याने लावा. हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. 15 मिनिटांसाठी ते तसेच सोडून द्या. नियमितपणे हा प्रकार केल्यास रंध्रांचा आकार कमी होईल. सिबम सिक्रेशनचे संतुलन राखले जाईल. टोमॅटोत असलेल्या सी जीवनसत्त्वामुळे आरोग्यदायी चमकदार त्वचा मिळते.
सफरचंद - सफरचंद त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या जीवनसत्त्व सी, ए ने समृद्ध आहे. सफरचंदात नैसर्गिक अँटी-एजिंग सोल्यूशन आहेत. एक टीस्पून किसलेले सफरचंद घ्या. त्यात अर्धा चमचा नारळाचे तेल मिसळा आणि दोन ते तीन थेंब लेमन इसेंशियल आॅइल मिसळा. हे सर्व मिसळून त्याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. अर्ध्या तासाने हे धुऊन टाका. तुमची त्वचा कोरडी असल्यास लेमन इसेंशियल आॅइलऐवजी कॅस्टर कॅरियर आॅइलचा वापर करा.
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरी अँटीआॅक्सिडंट्सनी म्हणून समृद्ध आहे. बंधक गुण आणि सूज कमी करण्याच्या गुणधर्मामुळे त्वचेच्या जीर्णतेची प्रक्रिया धिमी होते. त्याशिवाय सूर्यप्रकाशाने होणारी त्वचेची हानी बरी करते. अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्याशिवाय त्वचेतील मृत पेशी काढते, पुरळ नियंत्रणात आणते. पिगमेंटेशनवर नियंत्रण ठेवते, तसेच त्वचेवरील डागही नियंत्रित करते. एक टीस्पून स्ट्रॉबेरी, अर्धा टीस्पून कोको पावडर आणि एक ते दोन थेंब लॅव्हेंडर इसेंशियल आॅइलचे मिश्रण तुमची त्वचा डागरहित नितळ करू शकते.
मधाच्या पोळ्याचं मेण : बीसवॅक्स हे प्रभावी आणि नैसर्गिक थिकनिंग एजंट आहे. त्याचा घट्टपणा आणि त्यातील मृदुपणा हा प्रामुख्याने लोशन्स आणि मलमांमध्ये दिसतो. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक रूपामध्ये जतन करणे शक्य होते. कोरडी, खरबरीत त्वचा यांच्या उपचारांसाठी हे उपयुक्त ठरते.