30 ते 44 वयोगटातील सर्वांचे आजपासून होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 05:00 AM2021-06-19T05:00:00+5:302021-06-19T05:00:17+5:30
शनिवारी जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात होणार आहे; तर सोमवार (दि. २१) पासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या गटातील नागरिकांना लस मिळणार आहे. या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आज, शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यात शहरी भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीमध्ये ५० टक्के सूट राहणार आहे. ग्रामीण भागात संपूर्णपणे ऑफलाईन पद्धतीनेच लसीकरण होणार असल्यामुळे नोंदणी करण्यातील तांत्रिक अडचणींचा अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता लसीकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
शनिवारी जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात होणार आहे; तर सोमवार (दि. २१) पासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या गटातील नागरिकांना लस मिळणार आहे. या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्यामुळे लस घेण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आरोग्य कर्मचारी, महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी बऱ्याच प्रमाणात जनजागृती करण्यात यश आले.
केंद्रावर गर्दी करू नये
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरणासाठी वयोगट निश्चित केला जात आहे. आता ३० वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात येत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच लसीकरणासाठी येताना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आवश्यकतेनुसार करणे याबाबत काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.
या केंद्रांवर होणार आज लसीकरण
आज, शनिवारी ३० वर्षांवरील सर्व नागरिकांना जिथे लस मिळणार आहे, त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि पोर्ला, बोदली, अमिर्झा, पोटेगाव, गोकुळनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, देसाईगंज ग्रामीण रुग्णालय आणि सावंगी, कुरुड, कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, चामोर्शी ग्रामीण रुग्णालय आणि भेंडाळा, कुनघाडा, आमगाव, कोनसरी, मार्कंडा प्राथमिक आरोग्य केंद्र, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयासह वडधा, देलनवाडी, वैरागड, भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयासह देऊळगाव, कढोली, मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, अहेरी उपजिल्हा रुग्णालयासह महागाव, कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरची ग्रामीण रुग्णालयासह बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र.