चाय पकोडा डे - आज खा मनसोक्त भजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:34 AM2018-07-30T10:34:55+5:302018-07-30T10:36:20+5:30
फूड एक्सपर्ट रुशिना मन्शो घडियाल आणि काही फूड ब्लॉगर्सनी एकत्र येत indian food observance day ही संकल्पना राबवली आहे. त्यानुसार एक थीम ठरवून त्याप्रमाणे वेगवेगळे फूड डे सेलिब्रेट केले जातात. आज म्हणजे सोमवारी 30 जुलैला 'चायपकोडा डे' साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गरमागरम भजी खा आणि चहा आवर्जून प्या.
भक्ती सोमण
पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. या पावसाळ्याच्या धुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट ऑप्शन आहेच. पण तरी खरी गंमत आहे ती गरमागरम भजी किंवा पकोडा खाण्यात...
पाऊस सुरू झाला की घराघरात हमखास भजी पार्टी रंगते. कांदा भजी हा प्रत्येकाचा विक पॉईंट. भरपूर कांदा, त्यात तिखट, मीठ, डाळीचे पीठ थोडेसे तांदूळ पीठ आणि पाणी एकत्र करून सैलसर पीठ भिजवायचं. आणि गरमागरम तेलात ही भजी तळून खायची. खाताना जाम मजा येते. कांदयाबरोबरच बटाटा भजी, मिरची भजी होतेच होते.
मग बाजारात कणसं यायला लागतात. त्याची कुरकुरीत भजी पण अफलातून लागते. मात्र हे खाताना बरोबर चहा हवाच. आता हे वाचून भजी खाण्याची इच्छा होणे साहजिकच आहे. अशावेळी तुम्ही भजी करण्याच्या ओढीने स्वयंपाकघरात जाल. आठवेल की कांदा संपलाय. पण, मूढ घालवू नका. घरात जर कोबी, फ्लॉवर, गाजर अशा भाज्या असतील तर त्या एकत्र करून मिक्स व्हेज भजी करता येईल. नाहीतर मग मुग डाळ, चणा डाळ किंवा सर्व प्रकारच्या डाळ एकत्र करून त्याची भजी करता येईल. आहे का नाही पर्याय! बाजारात तर या कालावधीत ओव्याची पाने, रानभाज्या मिळतात, त्याचीही भजी मस्त लागते.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या भज्या होतातच, पण बाहेरच्या प्रांतातही या भजी किंवा पकोड्याचे खूप प्रकार बघायला मिळतात. त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलुया. पण आज आहे चाय पकोडा डे. आज काय करायचे तर मनसोक्त भजी (पकोडे) खायची आणि तेही चहा पिता पिता. मुंबई आणि उपनगरातली काही हॉटेल या पकोडा डेत सहभागी होणार आहेत. तेव्हा घरी जर पकोडे करायला जमले नाहीत तर तिथे खा. आणि भजी खाता खाता पाऊस पडला तर खरी मजा येईल. हो ना!
वाटल्यास तुम्ही तुमचे चहा भजी खातानाचे फोटो #chaipakodaday या हॅशटॅगने शेअर करा.