Ashadhi Ekadashi Special : उपवासासाठी नवे पर्याय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:41 AM2018-07-20T08:41:59+5:302018-07-20T08:45:11+5:30
आषाढी एकादशी चार दिवसावर आली आहे. तो दिवस उपवासाचा. त्यामुळे यावेळी उपवासाचे कोणते पदार्थ करायचे याची चर्चा सध्या घराघरात सुरू आहे.
- भक्ती सोमण
आषाढ महिना सुरू आहे. आषाढ महिना म्हटलं की आपुसकच आठवते पंढरीची वारी. आणि वारकऱ्यांना आस लागते ती विठूरायाच्या दर्शनाची. आषाढी एकादशी चार दिवसावर आली आहे. तो दिवस उपवासाचा. त्यामुळे यावेळी उपवासाचे कोणते पदार्थ करायचे याची चर्चा सध्या घराघरात सुरू आहे. संपूर्ण दिवसभर उपवास असल्याने पदार्थांच्या सामानाची जुळवाजुळव अनेक घरात सुरू झाली असेल.
पण, उपवास म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गरमागरम साबुदाण्याची खिचडीच. दाण्याचे कुट, बटाटा,मिरच्या आणि वर नारळ घातलेली गरमागरम खिचडी खाऊन समाधान मिळतं. ज्यांचा उपवास नाही तेही यावर तुटून पडतात. याशिवाय व-याचे तादूंळ, विविध फळे आणि बटाटा, रताळे असे प्रामुख्याने खाल्ले जाते. पण साबुदाणा खिचडी तर मस्ट गटात मोडणारी. पण दरवेळी साबुदाणा खिचडी करण्यापेक्षा साबुदाण्याचे काही वेगळे प्रकारही करता येऊ शकतात. परदेशात तर असे प्रकार सर्रास होतात.
परदेशात साबुदाण्याला सागो म्हणतात. साऊथ आफ्रिका, मलेशिया,सिंगापूर, फिलिपिन्स अशा अनेक भागात सागोपासून पदार्थ केले जातात. सागोपासून म्हणजेच साबुदाण्यापासून डेझर्ट करता येऊ शकते. गुलामेलाका हे मलेशियन डेझर्ट उपासाचे पुडिंग म्हणून खाता येऊ शकते. हे डेझर्ट साबुदाणा, नारळाचे दूध, गूळ, कण्डेन्स मिल्क मध, ड्रायफ्रुट्स वगैरे वापरून बनवता येते. तर साबुदाणा, केवडा, रोझवॉटरचा वापर करीत 'मोलाबिया' हे अरेबिक स्टाईल डेझर्ट करता येते. हे प्रकार गोड असले तरी या उपवासाला नक्की ट्राय करून पहा!
साबुदाणा असा होतो तयार
दुस-या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे 1940च्या आसपास पोर्तुगीजांनी साबुदाणा भारतात आणला. रोजच्या जेवणापेक्षा वेगळा पर्याय म्हणून त्याला लोकांनी सहज स्विकारले. अशाच पद्धतीने बटाटा, रताळे यांचेही झाले. मात्र साबुदाणा तयार होण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. दक्षिण पूर्व आशियाई राज्यातील जंगलांमध्ये Metroxylon Sagu हे एका विशिष्ट पामचे झाड आहे. जेव्हा ते 15 वर्षांचे होते तेव्हा त्याला आधी फुले मग फळे येतात. जेव्हा त्याची उंची 30 फूट होते त्यावेळी त्याचा बुंधा कापून त्यातला स्टार्च काढून घेतला जातो. मग त्याची पावडर केली जाते.एका पामच्या झाडातून 350 किलो स्टार्च निघू शकतो.या पावडरला चाळणी आणि कपड्यावर पाणी घालून मळले जाते. दोन-चार वेळा धुतल्यावर ते पीठ वापरण्यायोग्य होते. त्यानंतर त्याचे छोटे गोळे केले जातात. तो म्हणजे साबुदाणा. भारतातही आता अशाप्रकारे साबुदाणा आता सर्रास तयार होतो. साबुदाण्याच्या प्रकारांविषयी शेफ प्रसाद कुलकर्णी म्हणाला की, आपल्या भारतात दोन प्रकारचे साबुदाणा मिळतात. पहिल्या प्रकारात साबुदाणा भाजून ठेवतात आणि खिचडीला वापरला जाणारा साबुदाणा हा दुस-या प्रकारात मोडतो. त्याचे आकारही वेगवेगळे आहेत. मोतीदाणा, खिरदाणा आणि बडादाणा असे आकार यात येतात. पण खिचडीसाठी अमकाच साबुदाणा पाहिजे असे काही नसते.