फक्त याच काळात बनू शकणारे बाळकैरीचे लोणचे नक्की करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:38 PM2019-03-23T17:38:34+5:302019-03-23T17:39:55+5:30
कैऱ्या झाडाला लागल्यावर काही दिवसात अगदी लहान आकारात असताना त्यांना बाळकैरी म्हटलं जाते. या कैरीचं लोणचं अगदी सुरुवातीला केले जाते. ते वर्षभर टिकत नसले तरी आता कैरीचा मोसम आला या लोणच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
पुणे : प्रत्येक फळ किंवा भाजी ही खास तिच्या मोसमात खावी असे म्हटले जाते. जसे की पाऊस पडल्यावर खराब होतात म्हणून लगेचच आंबे खाणे बंद केले जाते. तसंच कैऱ्या झाडाला लागल्यावर काही दिवसात अगदी लहान आकारात असताना त्यांना बाळकैरी म्हटलं जाते. या कैरीचं लोणचं अगदी सुरुवातीला केले जाते. ते वर्षभर टिकत नसले तरी आता कैरीचा मोसम आला या लोणच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा यंदा अजिबात वेळ वाया न घालवता या बाळकैऱ्यांचे चटपटीत लोणचे नक्की करून बघा.
साहित्य :
- बाळकैऱ्या आठ ते दहा
- तेल पाव वाटी
- मेथ्या पाव चमचा
- मीठ दोन चमचे
- कैरी लोणचे मसाला
- साखर एक चमचा
- बडीशेप एक चमचा
कृती :
- बाळकैऱ्या अंदाजे दोन तास थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे या कैऱ्यांना लागणार चीक निघून जाईल.
- या कैऱ्या पातळ उभ्या कापून कोयापण चिरून घ्या.
- या कैऱ्या तयार न झाल्यामुळे करकरीत आणि थोड्याशा तुरट-आंबट चवीच्या लागतात.
- आता तेल गरम करून घ्या. तेल थंड होत असताना पाव चमचे मेथीचे दाणे, दोन चमचे कैरी लोणचे मसाला आणि गरजेनुसार मीठ घाला. त्यातच चमचाभर बडीशेप ठेचून किंवा कुटून घाला.
- हे सर्व मिश्रण एकजीव करून कैरीच्या फोडींवर टाका आणि चमच्याने सारखे करून घ्या.
- शेवटी चवीपुरती साखर घालून हे लोणचे २४ तास मुरण्यास ठेवावे. आणि ताजे ताजे बाळकैरीचे लोणचे सर्व्ह करावे.