शाकाहार चांगला असतो पण का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:50 PM2017-10-26T17:50:08+5:302017-10-26T18:01:07+5:30

याच महिन्याच्या सुरूवातीला जागतिक शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. शाकाहार मानवी जीवनासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी किती लाभदायक आहे याचाच उहापोह या दिवसानिमित्त संपूर्ण महिनाभर जगभरात करण्यात येतो. शाकाहारी भोजनामुळे मानवास होणारे फायदे हेच त्याचे वैशिष्ट्यं आहे.

Be Vegeterian but why? | शाकाहार चांगला असतो पण का?

शाकाहार चांगला असतो पण का?

Next
ठळक मुद्दे* शाकाहारी व्यक्तींना मज्जासंस्थेचा रोग होण्याचं प्रमाणही खूप कमी आहे. तसेच शाकाहार करणा-याचं मानसिक आरोग्यही खूपच चांगलं असतं.* शाकाहारात भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी, इ मॅग्नेशियनम, फायटोकेमिकल्स, असंपृक्त चरबी यांचा समावेश होतो. त्यामुळे शाकाहार करणा-यामध्ये सहसा उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, हृदयविकार याचा धोका कमी असतो.* शाकाहारामुळे मधुमेही व्यक्तींचा आहार खूप चांगल्या रितीनं नियोजित केला जाऊ शकतो. 



- सारिका पूरकर गुजराथी



याच महिन्याच्या सुरूवातीला जागतिक शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीनं 1977 मध्ये या दिवसाची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. त्यानंतर इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियननं 1978 पासून या संकल्पनेस प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला होता. शाकाहार हा मानवी शरीरासाठीच नव्हे तर निसर्गासाठी, पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे, शाकाहाराचं महत्व, माहिती सर्वसामान्यांना व्हावी, त्यांनी शाकाहाराचा अंगीकार करावा, यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.

संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात यासंदर्भात जनजागृती केली जाते. भारतास महान संत परंपरा लाभली आहे. या संतांनी सुरूवातीपासून सात्विक आहाराला प्राधान्य दिलं आहे. कंदमुळे, पाणी याचा भरपूर वापर ते आहारात करीत असत. त्यानंतरच्या काळात जसजशी मानवानं प्रगती केली, नवनवीन धान्यं, फळं, भाजीपाला यांचं उत्पन्न होऊ लागले त्यानुसार पाककला, आहार यातही बदल होत गेले. जसा आहार तसा विचार ही उक्ती आहारासंदर्भात चपखल बसते. म्हणूनच शाकाहार मानवी जीवनासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी किती लाभदायक आहे याचाच उहापोह या दिवसानिमित्त जगभरात करण्यात येतो. शाकाहारी भोजनामुळे मानवास होणारे फायदे हेच त्याचे वैशिष्ट्यं आहे.

 

शाकाहार कशासाठी?

1) उत्तम विचारशक्ती आणि मानसिक आरोग्य

मांसाहारी पदार्थांमध्ये अराचोनिक नावाचं आम्ल आढळतं यामुळे माणसाच्या विचारशक्तीवर विपरित परिणाम होत असतो. त्याचे मूड्स विचलित होत असतात. शाकाहारी पदार्थांमध्ये मात्र हे आम्ल आढळत नसल्यामुळे हा धोका उत्पन्न होत नाही. बेनिदेक्तिन विद्यापीठानं यासंदर्भात संशोधन केल्यावर त्यांनीही निरीक्षण नोंदवलं आहे, की मासे, मीट म्हणजेच मटन, चिकन इ.पदार्थांचे सेवन केल्यानंतर माणसाचे मूड्स प्रचंड डिस्टर्ब होत असतात. याव्यतिरिक्त क्रोएशियात करण्यात आलेल्या आणखी एका सर्वेक्षणानुसार असंही लक्षात आलंय की शाकाहारी व्यक्तींना मज्जासंस्थेचा रोग होण्याचं प्रमाणही खूप कमी आहे. तसेच शाकाहार करणा-याचं मानसिक आरोग्यही खूपच चांगलं असतं.
 

2) हृदयविकाराचा धोका कमी असतो.
शाकाहारामुळे हृदयविकार, कॅन्सरसारख्या आजारांचे धोके देखील खूप कमी प्रमाणात उत्पन्न होतात. कारण शाकाहारात भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी, इ मॅग्नेशियनम, फायटोकेमिकल्स, असंपृक्त चरबी यांचा समावेश होतो. त्यामुळे शाकाहार करणा-यामध्ये सहसा उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, हृदयविकार याचा धोका कमी असतो.
 

3) लठ्ठपणा दूर ठेवतो
शाकाहरी नागरिक शक्यतो त्यांच्या आहारातील पदार्थांची निवड खूप जाणीवपूर्वक करतात. उगाच मजामस्ती करायची म्हणून खायचं किंवा मग जसा मूड असेल तसं खायचं असं ते करीत नाहीत. साहजिकच यामुळेच लठ्ठपणा हा जो एक नवा शारीरिक व्याधीचा प्रकार सध्या पाहायला मिळतोय, तो शाकाहरींमध्ये खूप कमी आढळून येतो. एका संशोधनाअंती देखील हे सिद्ध झाले आहे.

4)मुतखडयाचा धोका कमी होतो.
मांसाहरातून मिळणारे प्रोटीन्स वर्ज्य करु न जर भाज्यांचं सेवन जास्त प्रमाणात केले तर मुतखडा हा विकार कधीच उद्भवत नाही.


5) मधुमेहाचं नियंत्रण शक्य
शाकाहारामुळे मधुमेही व्यक्तींचा आहार खूप चांगल्या रितीनं नियोजित केला जाऊ शकतो. त्यामुळेच मधुमेहावर नियंत्रण मिळवणं शाकाहारामुळे खूप सोपं होतं.
 

6) सर्वांसाठी उपयुक्त आहार
शाकाहार असा आहार आहे, जो सर्व वयातील नागरिकांसाठी म्हणजेच अगदी नवजात बालकापासून तर प्रोैढ, ज्येष्ठ नागरिक किंवा खेळाडू असू देत, सर्वांसाठी शाकाहार खूप लाभदायी आहे. शाकाहारी व्यक्तींना नेहमी प्रोटीन्सची कमतरता भासते, ते नेहमी लवकर थकतात, स्टॅमिना कमी असतो असं आपण अनेकदा अनेकांकडून ऐकलं आहे. परंतु, यात काहीच तथ्य नाहीये. कारण शाकाहारी माणसांनी आहारातील घटकपदार्थांचं योग्य नियोजन, योग्य प्रमाण राखलं तर अनेक रोगांना पळवून लावण्याची क्षमता त्यांच्या शरीरात निर्माण तर होतेच शिवाय परिपूर्ण आहाराच्या सर्व गरजा शाकाहार व्यवस्थित पूर्ण करतो.

 

 

 

 

Web Title: Be Vegeterian but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.