डाळिंबाची साल ठरते आरोग्यदायी; असा करा आहारात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:53 PM2018-12-13T14:53:36+5:302018-12-13T14:57:17+5:30
आतापर्यंत तुम्ही डाळिंबाचे फायदे ऐकले असतील पण तुम्ही कधी डाळिंबाच्या सालीबाबत ऐकलं आहे का? डाळिंबाप्रमाणेच डाळिंबाच्या सालीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आतापर्यंत तुम्ही डाळिंबाचे फायदे ऐकले असतील पण तुम्ही कधी डाळिंबाच्या सालीबाबत ऐकलं आहे का? डाळिंबाप्रमाणेच डाळिंबाच्या सालीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा वापर कसा करायचा? तुम्ही डाळिंबाच्या सालीचा चहा तयार करू शकता. हा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. या चहामध्ये अनेक अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासोबतच, कॅन्सरपासूनही बचाव होतो. त्वचेसाठीही हा चहा उपयोगी ठरतो. त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी हा अत्यंत गुणकारी ठरतो.
असा तयार करा डाळिंबाच्या सालींपासून चहा :
- डाळिंबांच्या सालींपासून चहा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक कप पाणी गरम करा.
- आता या पाण्यामध्ये एक चमचा डाळिंबाच्या सालींची पावडर एकत्र करा.
- थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजल्यानंतर मिश्रण गाळून घ्या.
- चव वाढविण्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मध मिक्स करा.
डाळिंबाच्या सालीचे फायदे :
पोटाच्या समस्यांवर गुणकारी
डाळिंबाच्या सालींमध्ये अॅन्टीऑक्सिडंट तत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे डाळिंबांच्या सालींपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. जेवल्यानंतर या चहाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तर पोटाच्या इतर समस्या दूर होण्यासही मदत होते.
घशामध्ये खवखव
जर तुमच्या घशामध्ये सतत खवखव होत असेल तर तुम्हाला टॉन्सिलचा त्रास आहे, हे स्पष्ट होते. डाळिंबाच्या सालीच्या चहाचे सेवन केल्यामुळे घशातील खवखव दूर करण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास
फ्लेवेनाइड्स, फेनॉलिक्स यांसारखे अॅन्टी-ऑक्सिडंटयुक्त चहा प्यायल्याने हृदयाचे आरोग्या चांगले राखण्यास मदत होते. या चहामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी
चहामध्ये असलेले अॅन्टी-ऑक्सिडंटमुळे हा प्यायल्याने वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात. तुमची त्वचा वयापेक्षाही जास्त तरूण दिसते. या चहामधील अॅन्टऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सला न्यूट्रिलाइज करतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डोळ्यांखालील काळी वर्तळे दूर होतात.
सांधेदुखीवर परिणामकारक
डाळिंबाच्या सालीचा चहा प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होतो तसचे हाडं बळकट होण्यास मदत होते.