नारळ खाणार त्याला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:36 PM2019-04-03T20:36:36+5:302019-04-03T20:38:25+5:30
पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते.
भक्ती सोमण
जागतिकीकरणामुळे पाश्चात्य जगातले बरेचसे पदार्थ आता भारतात चांगलेच स्थिरावले आहेत. किंबहुना तेच पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या मातीतले, संस्कृतीतले पदार्थ टिकवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यातूनच कम्युनिटी फूड ही संकल्पना संध्या जोरावर आहे. आपल्या घरी, किंवा एका ठिकाणी लोकांना बोलवून आप आपल्या प्रांतातले पदार्थ यात खिलवण्यात येतात. या कंसेप्टला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. ब्राम्हणी, सीकेपी, सारस्वत, कारवारी, मालवणी पंजाबी, अवधी, पारशी अशा कितीतरी कम्यूनिटीजच्या थाळी म्हणून तर लोकप्रिय होत आहेत. इथे तुम्हाला त्या त्या कम्युनिटीचे अस्सल चवीचे पदार्थ खायला मिळतातच. म्हणून तर अशा थाळ्यांना एक विशेष महत्व आहे.
आता हेच बघा ना, नारळ घालून केलेले पदार्थ हे प्रामुख्याने कोकणपट्टी भागात जास्त आढळतात. तेच सोलापूर सारख्या भागात भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचा वापर केला जातो. विदर्भात सुक्या खोबऱ्याचा वापर मसाल्यात जास्त आढळतो. असे कित्येक बदल दर कोसावर आपल्या खाद्यसंस्कृतीत दिसतात. नारळाचा सढळ हस्ते वापर कारवारी खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणावर आढळतो. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला भाग म्हणजे कारवार. त्यामुळे इथे नारळाचा वापर जेवणात सढळहस्ते केला जातो. महाराष्ट्रीय जेवणात जसे गोडा मसाल्याला, गरम मसाल्याला महत्व असते. तसेच महत्व कारवारमध्ये नारळाला असते. आपले मसाले आपण वर्षभरासाठी करून ठेवतो. पण तिथे ताजा ताजा मसाला करावा लागतो. त्यात नारळाबरोबर धणे,चिंच, आणि लाल मिरच्यांचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला रंग जरी लाल आला तरी चवीला मात्र सौम्य आणि चटकदार असतात. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन पूर्णच होत नाही.
अशी कारवारी चवदार चव नुकतीच माधवी कामत यांच्यामुळे चाखायला मिळाली. मुळच्या कारवारच्या असलेल्या माधवी कामत यांच्या कारवारी जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी सध्या अंधेरीच्या कोहिनूर कॉन्टिनेंटलमध्ये मिळू शकते. तिथे शाकाहारी आणि मासांहारी असे अस्सल कारवारी प्रकारचे जेवण हा एक निराळा अनुभव आहे. नारळापासून इतके सुंदर आणि चविष्ट प्रकार ही या जेवणाची खासियत आहे.
आपल्याकडे ज्याप्रमाणे पन्हे केले जाते त्याप्रमाणे तिकडे पानक केले जाते. पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते. पण साध्या पाण्यात गूळ, वेलची पावडर, लिंबू, किंचित आलं आणि काळी व पांढरी मिरी क्रश करून हे पानक केले जाते. याशिवाय पुरणाचा सुरकुंड्या हा प्रकारही वेगळा होता. भाकरीबरोबर कैरी उडद मेथी, चणे सुरण करी, , जीरे, मिरे कढी, पांढरा वाटाणा आणि लाल भोपळ््याची भाजी अशा काही नारळाच्या करीत केलेल्या भाज्या खाताना मजा आली. असे जिव्हा तृप्त करणारे कितीतरी पदार्थ होते. मुंबईमध्ये कारवारी लोक भरपूर आहेत. पण प्रत्येकाला कारवारी जेवण करता येतंच असं नाही असे माधवी कामत यांनी सांगितले. त्यामुळे जिव्हातृप्तीसाठी हे पदार्थ खायचा नक्की प्रयत्न करा.