शिळ्याला बनवा खमंग आणि चटपटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:22 PM2017-10-27T18:22:30+5:302017-10-27T18:27:18+5:30
उरलेल्या पदार्थांना केवळ शिळे पदार्थ म्हणून न हिणवता, त्यांचाच मेकओव्हर केला तर छान नाश्ता, स्नॅक्स, स्टार्टर्स तयार होऊ शकतात.
- सारिका पूरकर-गुजराथी
दिवाळीची धामधूम संपली. खमंग फराळ, गोडाधोडाचे बेत झाले. तशी दिवाळी संपली असली तरी माहेरवाशिणी अद्याप त्यांच्या त्यांच्या माहेरी असल्यामुळे दिवाळीच्या पुढे आठ पंधरा दिवस दिवाळी सुरूच असते. त्यानिमित्त मेजवानीचे जेवणही घरोघरी होतात. हे मेजवानीचे, पाहुणचाराचे जेवण म्हटले की सर्वच पदार्थ मुबलक प्रमाणात तयार केले जातात. साहजिकच सर्वांचं जेवण होऊनही ते काहीवेळा उरतातच. या उरलेल्या पदार्थांना केवळ शिळे पदार्थ म्हणून न हिणवता, त्यांचाच मेकओव्हर केला तर छान नाश्ता, स्नॅक्स, स्टार्टर्स तयार होऊ शकतात. तुमच्या घरी पण उरले आहेत ना काही पदार्थ? मग या लेफ्टओव्हर पदार्थांचाच मेकओव्हर करु न पाहा.
1) पोळीच्या नूडल्स
उरणा-या पदार्थांमध्ये नेहमीच पोळीचं प्रमाण जास्त असतं. एरवी आपण फोडणीची पोळी बनवतोच. पण पोळीच्या नूडल्स म्हणजे त्याचं पुढचं व्हर्जन म्हणायला हवं. त्यासाठी पोळीचे लांब पास्त्याच्या आकारात रिबन कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण, आल्याचा किस घालावा. लगेच शिमला मिरची, गाजर, मटार, घेवडा, पत्ता कोबीचे लांब काप घालून भराभर परतून घ्यावं . यात सोया सॉस, चिली सॉस घालावा. तसेच काळीमिरी पावडर, मीठ घालावं. आणि मग यात पोळीच्या रिबन्स घालाव्यात. त्या चांगल्या परतून कोथिंबीर घालून खाव्यात. चायनीज फोडणीची पोळी असंही यास संबोधता येईल. पोळी सॉसमध्ये खूप भिजून मऊ पडणार नाही याची काळजी मात्र घ्यायला हवी. उरलेल्या पोळ्यांपासून मसाला पोळी हा टेम्प्टिंग प्रकार देखील करु न पाहता येतो. पिझ्झा सॉस, भाज्यांचं सारण, कांदा-शेव भुरभुरु न तयार होते मसाला पोळी.
2) झटपट पाव भाजी
बटाट्याची किंवा मिक्स भाजी उरली असेल तर ही झटपट पावभाजी करु नच पाहायला हवी. उरलेली भाजी चांगली घोटून घ्यावी. तेल गरम करु न त्यात आलं-लसूण पेस्ट घालून ती परतून घ्यावी. त्यात एक पेला पाणी घालून मिश्रणाला उकळी काढावी. त्यात घोटलेली भाजी घालावी. नंतर गरम मसाला, पावभाजी मसाला घालून मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यावं. वरतून भरपूर कोथिंबीर आणि कांदा पेरावा आणि बटर टाकावं. हवं असल्यास यात टोमॅटो प्युरी, कांदा पेस्ट घालू शकता. याचप्रमाणे उरलेल्या वरणापासूनही झटपट पावभाजी तयार होते.
3) भाताची खीर
जर चांगल्या प्रतीच्या तांदळाचा भात उरला असेल तर तोच तो फोडणीचा भात करु नका. त्यापेक्षा एक गोडाची डिश करु न पाहा. उरलेला भात पाण्याचा हबका मारु न वाफवून घ्या. नंतर चांगला घोटून घ्या. दूध उकळून अर्धे करून त्यात घोटलेला भात, चवीनुसार साखर, ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा उकळी काढा. ही खीर गार करून छान लागते.
4) मसाला इडली
उरलेल्या इडलीपासून इडली फ्राय, उपमा आपण करत आलोय. परंतु, चवीला जरा झणझणीत असा मसाला इडली हा प्रकार खूप भन्नाट आहे. तेल गरम करु न त्यात कांदा,टोमॅटो, हळद, तिखट, गरम मसाला,मीठ घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. पाण्याचा हबका मारून शिजवून घ्या. या मसाल्यात इडलीचे तुकडे घालून मिक्स करा. याचप्रकारे इडली मंचुरियन देखील करता येतात. त्यात भाज्यांचे काप, सोया, चिली सॉस घालावा लागेल इतकेच.
5) भरीत सॅण्डविच
वांग्याच्या भरीतापासूनचा हा हटके चव देणारा प्रकार करायला सोपा आणि चवीला पण खूप क्र ंची, चटपटीत असा आहे. ब्रेड स्लाइसाला बटर, चटणी लावून त्यावर वांग्याचं भरीत पसरवून घ्या. त्यावर किसलेलं चीज, कोथिंबीर घालून सॅण्डविच शेकून घ्यावं. गरमागरम सॅण्डविच सॉस किंवा चटणीबरोबर खावं.
6) कटलेट्स आणि धिरडी
बरेचदा भात, रवा किंवा दलिया, ओट्सचा उपमा, पोहे हे जास्तीचे होतात. यात बेसन, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर, कांदा, पालक-मेथी-कोथिंबीर घालून छान कटलेट्स बनवता येतात. तसेच मिश्रण पातळ करु न धिरडी देखील काढता येतात.
7) दशम्या-पराठे
उरलेले वरण, पिठले यात कणिक, ज्वारीचं पीठ, मसाले घालून छान पराठे बनवता येतात.
8) भाकरीचा काला
भाकरी उरली तर हा आॅप्शन ट्राय करा. शिळी भाकरी बारीक कुस्करु न घ्या. घट्ट दह्यात कुस्करलेली भाकरी घाला. तेल गरम करु न त्यात जिरे-मोहरी, हिंग-कढीपत्ता, हिरवी मिरची घाला. किंचित हळद घालून ही फोडणी दही-भाकरीवर घाला. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून हा भाकरीचा चटपटीत काला खा.