औषधी गुणधर्म असलेला काळा तांदूळ माहितीये? भाव आहे ४०० रुपये किलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 09:26 AM2021-12-18T09:26:41+5:302021-12-18T09:28:00+5:30
काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म असतात. काळ्या तांदळाचा भात नियमित सेवन केल्यास शरीरातील अनेक आजार नाहीसे होण्यास मदत होते.
प्रवीण खिरटकर
वरोरा (जि. चंद्रपूर) : काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म असतात. काळ्या तांदळाचा भात नियमित सेवन केल्यास शरीरातील अनेक आजार नाहीसे होण्यास मदत होते. वरोरा परिसरात काही शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची लागवड केली असून, या तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळ्या तांदळाची लागवड करण्याचा विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे.
यांनी केला प्रयोग यशस्वी
वरोरा येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे निवृत्त अधिकारी श्रीहरी पोटे व निवृत्त मुख्याध्यापक वसंत बोर्डे यांची रामदेगी परिसरात शेती आहे. चंदनखेडा येथील सुधीर मुळेवार यांनी आपल्या शेतात काळा तांदूळ लावला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आसाम राज्यातून बियाणे चारशे रुपये प्रतिकिलो दराने बोलावले. मुळेवार यांनी दोन एकरामध्ये १६ क्विंटल उत्पादन घेतले, तर पोटे व बोर्डे यांनी एका एकरात २५ पोते उत्पादन घेतले.
- चीनच्या एका छोट्या भागात काळ्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मोठ्या वाड्यात राहणारे लोक हा तांदूळ खायचे.
- पांढऱ्या तांदळापेक्षा हा तांदूळ आरोग्यदायी व फायदेशीर आहे.
- या भातात ॲन्टिऑक्सिडंटस् आढळतात. ते शरीरातील दूषित घटक स्वच्छ करण्याशिवाय अनेक रोगांमध्ये फायदेशीर ठरतात.
- हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून या तांदळाचे सेवन दूर ठेवते.
सध्या बाजारात काळ्या तांदळाला ३५० ते ४०० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. पुढील वर्षी अधिक लागवड केली जाईल. सध्या शेतकरी या तांदळाची विक्री घरूनच करीत आहेत. बाजारपेठ उपलब्ध झाल्यास उत्पादन वाढेल, असे मानले जात आहे.
काळ्या तांदळात औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्याकरिता उपयुक्त आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्यास हरकत नाही.
विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, वरोरा