पंगतीला हद्दपार करणाऱ्या 'बुफे'ची कहाणी माहित्येय का? नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 08:09 AM2022-08-26T08:09:41+5:302022-08-26T08:10:16+5:30

ऐशीच्या दशकाच्या शेवटी कधीतरी लग्नातल्या पंगतीची जागा बुफेने घेतली. त्यानंतर ही पद्धत आणि शब्द चांगलाच वापरात आला.

Do you know the story of the buffet read here in detail | पंगतीला हद्दपार करणाऱ्या 'बुफे'ची कहाणी माहित्येय का? नक्की वाचा...

पंगतीला हद्दपार करणाऱ्या 'बुफे'ची कहाणी माहित्येय का? नक्की वाचा...

googlenewsNext

ऐशीच्या दशकाच्या शेवटी कधीतरी लग्नातल्या पंगतीची जागा बुफेने घेतली. त्यानंतर ही पद्धत आणि शब्द चांगलाच वापरात आला. पंगतीच्या जेवणाची गंमत वेगळीच होती, पण बुफेचे अनेक फायदे लक्षात आले. मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना मर्यादित मदतनिसांच्या मदतीने सर्व्ह करणे सोपे झाले, लोकांना सगळे पदार्थ एकत्र समोर मांडलेले दिसू लागले. त्यामुळे आपल्या आवडीनुसार पदार्थ वाढून घेता येऊ लागले. वाढण्याची वाट बघायची आणि त्याच्या ताटातल्या जिलब्या आपल्यापर्यंत पोहोचतील की नाही, याचे टेन्शन घेण्याचे आता कारण नव्हते. समारंभाला येणारे आणि समारंभ आयोजित करणारे, दोन्हींसाठी बुफे फायदेशीर ठरला.

पण मुळात बुफे जेवण पद्धत आली कुठून? बुफे हा शब्द फ्रेंच आहे. त्याचा उच्चार बफे असा आहे. बफे म्हणजे जेवणाचे पदार्थ मांडून ठेवता येतील, असे लांबट टेबल टेबलावर पदार्थ मांडून ठेवायचे आणि मग उपस्थितांनी हवे ते पदार्थ वाढून घ्यायचे ही पद्धत स्कैंडेनेव्हियातल्या काही देशांत होती; पण फ्रेंच लोकांनी खऱ्या अर्थाने बुफे लोकप्रिय केला. अठराव्या शतकात ब्रिटिशांनी आपल्या शेजाऱ्यांकडून ही पद्धत आत्मसात केली. इंग्लंडमध्ये बुफेची शान काही औरच होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये दोन प्रकारचा बुफे असे. 

पहिल्या प्रकारात दुपारी एक वाजताचा लंचन, ज्यात लोक आपल्या आवडीनुसार प्लेट भरून टेबलाभोवती बसत आणि मग वेटर्स तुम्हाला वेगवेगळी पेये आणून देत. कॉफी, चहा, ज्यूस टेबलावर आणला जाई आणि त्या दिवशीचा काही खास मेनू असेल तर तोही गरमागरम प्रत्येक टेबलापाशी आणला जाई. दुसऱ्या प्रकारात लोक उभे राहून जेवत. इतर वेळी सुरी, काटा, चमचा वापरून जेवणारे ब्रिटिश बुफेच्या वेळी मात्र सुरी वापरत नसत.

पुढे अमेरिकेने 'हवे तेवढे हवे ते खा' ही संकल्पना काही रेस्टॉरंट्समध्ये सुरू केली. अमेरिकेला एकूणच भरपूर प्रमाणात खाण्या-पिण्याचा नाद जो नाश्ता तुम्ही-आम्ही एक प्लेट उपम्यात संपवतो, त्यासाठी त्यांना निदान पाच सात पदार्थ आवडतात. विशेषतः उपाहारगृहांमध्ये चीझ, ब्रेड वगैरेंची रेलचेल असलेले पदार्थ कमी किमतीत देण्यासाठी चढाओढ असते. बुफे किंवा बफेला अमेरिकनांनी प्रेमाने लोकप्रिय केले, इतकेच नाही तर जगभरात पोहोचवले.

Web Title: Do you know the story of the buffet read here in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न