कोणत्या दुधात असतात सर्वात जास्त प्रोटीन? जाणून घ्या उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:44 AM2018-12-20T11:44:57+5:302018-12-20T11:45:20+5:30

लहान असो वा मोठे सर्वांसाठीच प्रोटीन अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे. त्यामुळे प्रोटीन मिळवण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो.

Do you know which milk contains the most protein | कोणत्या दुधात असतात सर्वात जास्त प्रोटीन? जाणून घ्या उत्तर

कोणत्या दुधात असतात सर्वात जास्त प्रोटीन? जाणून घ्या उत्तर

googlenewsNext

लहान असो वा मोठे सर्वांसाठीच प्रोटीन अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे. त्यामुळे प्रोटीन मिळवण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. डॉक्टर आणि डायडटीशिअन सुद्धा आहारात प्रोटीनचा समावेश करण्याचा सल्ला देत असतात. प्रोटीनयुक्त आहारात दुधाचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. कारण दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. याने लहान मुलांच्या विकासात मदत तर होतेच, सोबतच त्वचा आणि केसांसाठीही हेल्दी असतं. पण सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या दुधात असतं हे तुम्हाला माहीत आहे का? चला तेच जाणून घेऊ...

का गरजेचं आहे दुधातील प्रोटीन

दूध हे हाडांसाठी चांगलं मानलं जातं, त्यामुळे प्रत्येकालाच खासकरुन लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर मिळतात. याने हाडे आणि दात मजबूत होतात. त्यासोबतच यात प्रोटीनही असतं. पण आता प्रश्न हा उभा राहतो की, जास्त प्रोटीन कोणत्या दुधात असतात. चला जाणून घेऊ याचं उत्तर....

गायीचं दूध

गायीच्या दुधात व्हिटॅमिन डी भरपूर आढळतं. ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. व्हिटॅमिन डी सोबतच यात प्रोटीन, हेल्दी फॅट आणि कॅल्शिअम सुद्धा आढळतं. याने आपल्या शरीराच्या मांसपेशी निरोगी राहतात. यातील प्रोटीनबाबत सांगायचं तर गायीच्या एक कप दुधात ८ ग्रॅम प्रोटीन असतं. 

बकरीचं दूध

गायीच्या दुधाप्रमाणेच बकरीचं दुधही पौष्टिक असतं. यात वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी६, कॅल्शिअम, पोटॅशिअम फॉस्फोरस आणि रिबोफ्लाविनसारखे व्हिटॅमिन तसेच खनिजं असतात. त्यासोबतच बकरीच्या दुधात प्रोटीनही असतात. बकरीच्या कप दुधात ८.७ ग्रॅम प्रोटीन असतं. 

सोया दूध

सोयाबीन आणि पाण्याच्या मदतीने सोया दूध तयार केलं जातं. हे एक प्लांट बेस दूध आहे. जे आरोग्यसाठी फार गुणकारी मानलं जातं. सोया दुधात प्रोटीन, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतात. हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हे दूध एक चांगला पर्याय आहे. प्लांट बेस दूध असल्याकारणाने या दुधात कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटही कमी असतात.  सोयाच्या एक कप दुधात ७ ग्रॅम प्रोटीन असतं. 

बदामाचं दूध

बदाम तुम्ही अनेकदा भिजवून खाल्लं असेल, पण काय कधी तुम्ही बदामाचं दूध प्यायलात? या काहीच शंका नाही की, बदामप्रमाणेच बदामाचं दुधही महाग असणार. पण याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. इतर दुधांच्या तुलनेत या दुधात फार कमी कॅलरी असतात. तसेच सॅच्येरेटेड फॅटही यात फार कमी असतात. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असलेल्या बदामाच्या दुधात एक ग्रॅम प्रोटीन असतं. 
 

Web Title: Do you know which milk contains the most protein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.