‘गुपचूप खाऊ’खा आणि दिवसभर फ्रेश राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:12 PM2017-08-10T18:12:47+5:302017-08-10T18:21:05+5:30
कामावरून घरी जाईपर्यंत किंवा दिवसभराचं काम संपवून संध्याकाळ होईपर्यंत पोटातल्या भुकेचा संयमही तुटतो आणि भूक तुटून पडते. पोटात ही भूक उबाळून येणं आणि अशा भुकेपोटी खाणं संशोधकांच्या मते घातक असतं. ही भूक अशी उबाळून येवू नये म्हणून मध्ये मध्ये, काम करता करता गुपचुप खाऊ खाणं गरजेचं असतं.
- माधुरी पेठकर
जगण्यासाठी आपण काय करतो? उत्तर सोपं आहे. दोन वेळेस जेवतो. जगण्यासाठी दोन वेळेसचं जेवण हवंच पण उत्तम जगण्यासाठी दोन वेळेसचं जेवण एकाचवेळी पोटभरून न घेता दोनाचे पाच भाग करा. आणि दिवसभरातून पाच वेळा थोडं थोडं खा. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि दोन वेळेस छोटा खाऊ. खाण्याचे असे पाच भाग करून खाल्ले तर दिवसभर आपल्यातली ऊर्जा टिकून राहाते. दिवसातून पाच वेळेस थोडं थोडं खाणार्याच वजनही आटोक्यात राहातं असं संशोधनातून सिध्द झालं आहे.
एरवी कामाच्या ठिकाणी दुपारचा डबा खाऊन झाल्यावर आपण खाण्याचं टाळतो. दुपारच्या जेवणानंतर दोन तीन तासांनी पोटात भूक जागी होते. पण ‘आता नाही काही खायला मिळणार’असं टपली मारून तिला शांत केलं जातं. कामावरून घरी जाईपर्यंत किंवा दिवसभराचं काम संपवून संध्याकाळ होईपर्यंत पोटातल्या भुकेचा संयमही तुटतो आणि भूक तुटून पडते. पोटात ही भूक उबाळून येणं आणि अशा भुकेपोटी खाणं संशोधकांच्या मते घातक असतं. ही भूक अशी उबाळून येवू नये म्हणून मध्ये मध्ये, काम करता करता गुपचुप खाऊ खाणं गरजेचं असतं.
हा गुपचूप खाऊ खाल्ल्यानं भूक शमते तसेच दोन वेळेसच्या जेवणातून शरीरास आवश्यक पोषक घटक पोटात जात नाही ते घटक या गुपचूप खाऊमधून मिळू शकतात. या गुपचूप खाऊमुळे जेवणाच्या वेळेस आपण ताटावर तुटून पडत नाही. त्यामुळे एकाच वेळेस खूप खाल्लं जाण्याची शक्यता कमी होते. मधला खाऊ टाळून एकाच वेळेस खूप खाल्लं तर चयापचय क्रियेवर मोठा ताण पडतो. खाण्याआधी रक्तातील साखर एकदम कमी झालेली असते. आणि पोटातील ही स्थिती खाण्याबाबतची लालसा वाढवते, पोटात न्युरोपेपटाइड नावाचं रसायन तयार होतं जे कार्बोहायड्रेटची भूक वाढवतं. त्यातूनच मग जेवणाच्या वेळेस गोड, चमचमीत, तेलकट, मसालेदार खाण्याची इच्छा होते आणि तसं खाल्लंही जातं. यामुळे शरीराची कॅलरी कंट्रोल करण्याची क्षमता विस्कळीत होते. आणि त्याचा परिणाम थेट वजन वाढण्यावर होतो.
यापेक्षा एक नाश्ता आणि दोन जेवण यामध्ये दोन तीन तासानंतर गुपचूप खाऊ खाल्ला तर वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात, शरीरास आवश्यक घटक मिळतात, कॅलरी कंट्रोल राहातो. चयापचयाची क्रिया व्यवस्थित काम करते. आणि वजन आटोक्यात राहातं. दिवसातून पाच वेळा खाणं म्हणजे खादाडपणा करणं नव्हे. याला आपल्या खाण्याच्या सवयीला योग्य वळण लावणं म्हणतात.
गुपचूप खाऊ कधी खावा?
खूप वेळ पोटात काहीच नसणं, भुकेचं पोटात खूप वेळ रेंगाळणं हे चुकीचं आहे. अशी वेळ आपल्यावर दिवसभरातून एकदाही येवू देवू नये. एक नाश्ता आणि दोन जेवण यादरम्यान हा गुपचूप खाऊ खावा. सकाळी नाश्ता 9 वाजता झाला आणि दुपारी जेवण दोन वाजता होणार असेल तर 11.30 ते 12 दरम्यान थोडा खाऊ खावा. दुपारच्या जेवणानंतर थेट रात्री 8-9 वाजताच जेवणार असू तर संध्याकाळी पाच सहा वाजता थोडा खाऊ खावा. या गुपचूप खाऊमुळे पोटातून मेंदूला तृप्ततेचा संदेश जातो. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. दिवसभर काम करताना उत्साही वाटतं.
रात्रीच्या जेवणानंतर नकोच!
रात्री जेवल्यानंतर झोपेपर्यंतच्या काळात काही न खाणं उत्तम. रात्री जेवल्यानंतर गुपचूप खाऊची गरज पडत नाही. रात्री झोप येत नसेल तर अनेकदा खाण्याचा मोह होतो पण तो टाळावा. कारण अपुरी झोप, उशिरा खाणं यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. तसेच घ्रेलीन आणि लेप्टीनसारख्या हार्मोन्सवर त्याचा विपरित परिणाम होतो. हे हार्मोन्स भुकेची आणि तृप्तीची जाणीव करून देतात. या हार्मोन्सवर वाईट परिणाम झाला तर ही जाणीव हरवते.
गुपचूप खाऊ कोणता खावा?
गुपचूप खाऊ म्हणजे थोडा पण पौष्टिक खाऊ. गुपचूप खाऊ म्हणजे सटरफटर नव्हे. चटपटीत नव्हे. सफरचंद, चिकू, केळं किंवा एखादं मोसमी फळंही चालतं. गाजर, काकडी , बीट यासारख्या कच्च्या भाज्या खाव्यात. घरी असाल तर गुपचूप खाऊ म्हणून फळांची स्मूदीही घेता येते. एनर्जी बार, ओट, नागली किंवा गव्हाची बिस्किटं, ताक, नारळाचं पाणी, सुका मेवा, मुरमुर्याचा, लाह्यांचा चिवडा, मोड आलेली कच्ची उसळ हा खाऊ पोटात मोठी भूक भडकू देत नाही.