तळून भाजून याव्यतिरिक्तही पापड अनेक प्रकारे खाता येतो. पापडाचे टॅकोज, रोल्स हे प्रकार ट्राय करून पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 07:06 PM2017-08-08T19:06:46+5:302017-08-08T19:16:49+5:30

पापडाचा वापर आपण केवळ तोंडीलावणे म्हणून करत असाल तर थोडं हटके काहीतरी करून बघण्याची वेळ आली आहे. मसाला पापड, भेळ विथ पापड, पापड रोल्स, स्टफ्ड पापड एकदा ट्राय करून बघा.

Eat Regular papad in hot and spicy way | तळून भाजून याव्यतिरिक्तही पापड अनेक प्रकारे खाता येतो. पापडाचे टॅकोज, रोल्स हे प्रकार ट्राय करून पाहा!

तळून भाजून याव्यतिरिक्तही पापड अनेक प्रकारे खाता येतो. पापडाचे टॅकोज, रोल्स हे प्रकार ट्राय करून पाहा!

Next
ठळक मुद्दे* मसाला पापड घरी आणि तोदेखील वेगळ्या पद्धतीनं सहज बनवता येईल. तुम्ही पापडावर मक्याचे दाणे, मोड आलेले हिरवे मूग, ब्रोकोली, मशरुम्सदेखील पसरवू शकता.* पापडाचा कोन करून त्यातून कॉर्न भेळ, चायनीज भेळही खाता येते.* टॅकोज हा प्रकार जपानमध्ये लोकप्रिय आहे. आपण तो पापड वापरून घरच्या घरी तयार करु शकतो.

- सारिका पूरकर- गुजराथी


पापड. भारतीयांच्या जेवणातील एक महत्वाचा पदार्थ. सर्वाधिक लोकप्रिय. तोंडीलावणं म्हणूनही पापडाचा उल्लेख करता येईल. खिचडी, डाळ-भात तसेच इतर कोणत्याही पदार्थाबरोबर पापडाचा क्रंचीनेस एक वेगळीच खुमारी देतो. म्हणूनच तर पापडाशिवाय नैवेद्याचं ताटही भारतात पूर्ण होत नाही. उडीद डाळ, काळी मिरी, पापडखार, मीठ, तेल, जिरे यापासून बनणारा हा पापड म्हणजे खवय्यांचा वीक पॉर्इंटच आहे. भारतात राज्यपरत्वे या पापडाचे नानाविध प्रकार, चवी आढळतात. या सार्या चवी एकापेक्षा एक भन्नाट अशा आहेत. यातील घटक पदार्थही वेगवेगळे आहेत. पंजाबी, सिंधी पापड हा अत्यंत चवदार, सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखला जातो. हे पापड मोहरीचे तेल लावून लाटले जातात. तसेच या पापडात जिरे, मिरे यांचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळेही याची चव वेगळी लागते. सिंधी पापड हे साजूक तूप लावूनही लाटले जातात. त्यामुळे हे पापड अत्यंत मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे असतात. मारवाडी पापड हे मुगाच्या डाळीच्या पीठापासून बनवलेले असतात. तसेच या पापडात अत्यंत कमी मसाला वापरला जातो. हे पापड अत्यंत पातळ लाटले जातात. आकारानेही हे पापड मोठे असतात. मारवाडी पापडासोबतचा एक किस्सा लोकप्रिय आहे. तो म्हणजे, हा पापड अत्यंत पातळ असल्यामुळे हा पापड थेट गॅसवर भाजणं हे कौशल्याचं काम असतं. म्हणूनच मारवाडी, गुजराथी समाजात पूर्वी विवाहाकरिता मुलगी पसंत करण्याआधी तिला गॅसवर पापड भाजण्यास सांगितलं जायचं. एकप्रकारे तिची ही ‘पापड परीक्षा’च समजली जात होती! ती परीक्षा अशी की जर तिनं थेट गॅसवर पापड जळू न देता भाजला तर ती एक कुशल गृहिणी बनू शकते असा निष्कर्ष काढला जात होता! असो. तर पापडांच्या विश्वातील अन्य एक खूप चवदार प्रकार म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कोकणात बनणारा पोह्याचा पापड.. पोहे भाजून घेऊन त्याचे पीठ खलबत्त्यात कुटतानाच त्यात तिखट, पाणी, मीठ, पापडखार मिक्स करु न कुटून-कुटून त्याचा गोळा मळला जातो. त्यापासून बनलेले पोह्याचे पापड हे खूप चविष्ट लागतात. कोकणातील सोलकढी, भरपूर खोबरं घातलेली मुगाची खिचडी आणि तळलेला पोह्याचा पापड म्हणजे तृप्तीचे दुसरं नावच. याच पोह्याच्या पापडात पालक पापड, टोमॅटो पापड, पुदिना पापड असे फ्लेव्हर्स आता पाहायला मिळतात.
राजस्थानी पापड हा असाच एक पापडाचा वेगळा प्रकार. बिकानेरी, काठियावाड म्हणूनही तो ओळखला जातो. हा पापड हरभरा डाळीच्या पीठापासून बनतो. त्यात लाल मिरची घालून या पापडाला थोडा मसालेदार टच दिलेला असतो. हा पापड पातळ नाही तर थोडा जाड लाटलेला असतो. दक्षिण भारतात पापड हे अपलम किंवा पपडम म्हणून ओळखले जातात. पापडाची ही यादी येथेच संपत नाही बरं का.

उपवासाकरिताही पापडाची भरपूर व्हरायटी भारतात उपलब्ध आहे. साबुदाणा पापड, बटाट्याचे पापड या प्रकारातही वेगवेगळ्या चवी पाहायला मिळतात. साबुदाण्याचे पळीपापड, साबुदाण्याचे पीठ, बटाट्याचा लगदा एकत्र करून केलेले हिरवी मिरची, लाल मिरचीचे पापड असे हे प्रकार उपवासाचे तोंडीलावणे म्हणून खाल्ले जातात. भारतात आता डिस्को पापड हा प्रकारही खूप लोकप्रिय झाला आहे. सर्व प्रकारच्या पापडांचे लहान व्हर्जन म्हणजेच पाईप, पिलो, व्हील, स्टार या आकारातील पापड म्हणूनही याकडे पाहता येईल. सर्व पापडात डिस्को पापड मिळू लागले आहेत! लग्नसमारंभातील जेवणावळींसाठी तो चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. मोठे पापड तळून, भाजून आणि नंतर मोडून सर्व्ह करण्यापेक्षा लहान आकारातील डिस्को पापड सर्व्ह करायला सोपे जातात. तसेच नासाडीही टाळता येते..

वर्षानुवर्षे भारतीयांच्या जिभेवर अधिराज्य गाजविणार्या  पापडाचा उल्लेख इ. स. पूर्व 500 च्या काळातही आढळला आहे. तेव्हापासून आजपर्यंत पापड साम्राज्य अबाधित आहे.. तर अशा या पापडाचा वापर आपण केवळ तोंडीलावणे म्हणून करत असाल तर थोडं हटके काहीतरी करून बघण्याची वेळ आली आहे. काय करता येईल?

 

पापडाचे हटके चटपटीत पदार्थ

 

 

 

1) मसाला पापड

हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर्स म्हणून तुम्ही मसाला पापड आॅर्डर करता. कांदा, टोमॅटो, काकडीचे तुकडे, कोथिंबीर पेरलेला मसाला पापड ताव मारु न खातादेखील. मग हाच मसाला पापड घरी आणि तोदेखील वेगळ्या पद्धतीनं सहज बनवता येईल. तुम्ही पापडावर मक्याचे दाणे, मोड आलेले हिरवे मूग, ब्रोकोली, मशरुम्सदेखील पसरवू शकता. त्यावर आवडत असल्यास मेयोनीज, चीज, किसलेलं पनीरदेखील घालू शकता. बघा बरं तोच मसाला पापड हेल्दी होईल की नाही?

2) भेळ विथ पापड

घरच्या घरी तुम्ही मुलांना भेळ मग ती कसलीही असू दे, मोड आलेल्या कडधान्यांची, कॉर्न भेळ, चायनीज भेळ. पापड भाजून गरम असतानाच त्याचा कोन बनवा. जसा खारे शेंगदाणावाला बनवतो तसाच! मग या कोनातही भेळ भरुन द्या . भेळेलादेखील पापडामुळे क्रंची  चव येईल. याचप्रकारे पापड टोकरी, पापड कपदेखील बनवता येतो. पापड ओला करु न वाटीच्या बाहेर चिकटवून तेलात तळून घ्यायचा, पापडाची वाटी अलगद काढली की झाली पापड टोकरी तयार! यातही तुम्ही भेळ, किंवा एखादा रायता सर्व्ह करु शकता.
 

3) टॅकोज

हा प्रकार जपानमध्ये लोकप्रिय आहे. आपण तो पापड वापरून तयार करु शकतो. पापड भाजल्यावर गरम असतानाच त्याला टॅकोजचा आकार द्यावा हे करताना दोनही बाजू थोड्या आत वाकवाव्यात. या मधल्या भागात तुम्ही उकडलेल्या भाज्या, चीज भरून खाऊ शकता. नाचो हा प्रकारदेखील करून पाहता येतो. पापड त्रिकोणी आकारात कापून ते तळून घ्या. त्यावर कॉर्न, बटाटा, काळी मिरी पावडर भुरभुरा की नाचो तयार.

4) पापड रोल्स

चाटचा हा प्रकार खूपच हटके आहे. बटाटा, मटारचे सारण भरु न पापडाला पाण्याचा हात लावून त्याचा रोल बनवून तळले की झाले हे क्रंची  रोल तयार! यात तुम्ही नूडल्सचं सारणही भरु शकता. कॉर्न-पालकचे, पनीरचे सारणही भरु शकता.

5) स्टफ्ड पापड

फ्रँकीचा हा प्रकार पापड वापरु न बनवून पाहा. पापड भाजून गरम असतानाच रोल करा. यात आतमध्ये गाजर, सिमला मिरचीचे काप, टोमॅटो सॉस, पनीर, मीठ, काळी मिरी पावडर वापरु न तयार केलेले सारण भरा आणि खायला द्या.

6) पापडाची भजी

पापडाचे तुकडे भज्यांच्या पीठात बुडवून त्याची भजीही करता येतात.

 

 

Web Title: Eat Regular papad in hot and spicy way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.