तुम्हीही जेवताना लोणचं खाता का? वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:28 PM2018-10-22T17:28:37+5:302018-10-22T17:29:28+5:30
भारतीयांचं जेवणं लोणच्याशिवाय अधुरं समजलं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या ऋतूंनुसार बाजारात उपलब्ध होणाऱ्या फळं आणि भाज्यांपासून चटपटीत लोणची तयार केली जातात.
भारतीयांचं जेवणं लोणच्याशिवाय अधुरं समजलं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या ऋतूंनुसार बाजारात उपलब्ध होणाऱ्या फळं आणि भाज्यांपासून चटपटीत लोणची तयार केली जातात. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची लोणची आढळून येतात. लिंबू, गाजर, मिरची, लसूण, आंबे, आवळा, आलं यांसारखी अनेक लोणची घरी आणून चवीने खाल्ली जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? लोणचं जास्त खाणंदेखील तुमच्या शरीरासाठी घातक ठरतं. जाणून घेऊया गरजेपेक्षा जास्त लोणच्याचं सेवन केल्याने कोणत्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्याबाबत...
ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका
बाजारात मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं. मीठ हे एक प्रकारचं प्रिजर्वेटिव्ह आहे. जे पदार्थ खराब होण्यापासून वाचवतं. त्यामुळे बाजारातील लोणच्यामध्ये मीठाचा वापर अधिक केला जातो. जास्त मीठ खाणं शरीरासाठी घातक ठरतं. कारण यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका संभवतो. जर तुम्ही खूप लोणचं खात असाल तर शरीरातील मीठाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हायपरटेन्शनचा धोका संभवतो. तसेच ब्लड प्रेशरमुळे हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोकाही वाढतो.
मेंदूशी निगडीत आजार
जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्याने शरीरामध्ये पाणी एकत्र होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये सूजदेखील येते. कारण मीठामध्ये सोडिअम मोठ्या प्रमाणात असते. जास्त प्रमाणात सोडिअमचं सेवन करणं मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. कारण यामुळे मेंदूच्या नसांमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता. एवढचं नाही तर त्यामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
पचनक्रियेवर परिणाम
बाजारातून आणलेल्या लोणच्यांमध्ये प्रिजर्वेटिव्स म्हणून अनेक अॅसिडिक पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ज्यामुळे लोणचं दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे याची चवही चटपटीत होते. लोणचं कमी प्रमाणात खाण्यात आलं तर ते पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतं. कारण यामध्ये अनेक आयुर्वेदिक मसाल्यांचा वापर करण्यात येतो. परंतु जास्त प्रमाणात लोणचं खाणं हे पचनसंस्थेसाठी घातक ठरतं. लोणच्याचं जास्त सेवन केल्याने शरीरामध्ये ट्रायग्लिसराइडची लेव्हल वाढते.
हृदयाशी संबंधित आजारांचा धोका
बाजारामध्ये मिळणाऱ्या लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असतं. खरं तर लोणचं दिर्घकाळ टिकवण्यासाठी तेलाचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट्स आढळून येतात. त्यामुळे लोणचं जास्त खाणाऱ्या लोकांमध्ये हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका वाढतो.
कॅन्सरचा धोका
तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की, लोणचं जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. बाजारामध्ये मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये अत्यंत दुय्यम दर्जाचे प्रिजर्वेटिव्स वापरले जातात. त्यांमध्ये अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. असे केमिकलयुक्त लोणची खाल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.