उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने काही समस्या होते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 11:03 AM2019-05-22T11:03:23+5:302019-05-22T11:05:49+5:30
उन्हाळ्यात अंडी खाल्ली जावी की नाही याबाबत अनेकांमध्ये वेगवेगळी मते बघायला मिळतात. काही लोक म्हणतात की, उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
(Image Credit : Healthline)
उन्हाळ्यात अंडी खाल्ली जावी की नाही याबाबत अनेकांमध्ये वेगवेगळी मते बघायला मिळतात. काही लोक म्हणतात की, उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. तसेच काहींना वाटतं की, अंडी गरम असतात त्यामुळे उन्हाळ्यात समस्या होऊ शकते. काही रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, जास्त कोलेस्ट्रॉलचं सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो आणि त्यामुळे अंडी खाणं चांगलं नाही. पण नव्याने करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब नाकारली आहे.
उन्हाळ्यात रोज अंडी खावीत की नाही?
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे शरीरासाठी फार फायदेशीर असतं. प्रोटीन आवश्यक पोषक तत्त्व शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यास मदत करतं आणि सेल्सचं कामही योग्यप्रकारे होण्यास मदत करतं. पण अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला जातो की, खरंच अंड आरोग्यासाठी फायदेशीर आहे? खासकरून तेव्हा जेव्हा त्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक जास्त असतं. कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण हृदयासाठी चांगलं मानलं जातं नाही. काही असेही रिसर्च आहेत की, ज्यात सांगण्यात आलंय की, जास्त कोलेस्ट्रॉलचं सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका वाढतो. पण नव्या रिसर्चमध्ये याउलट सांगण्यात आलं आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की, अंडी खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका नसतो.
काय सांगतो रिसर्च?
यूनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनलॅंडच्या एका स्टडीनुसार, रोज एक अंड खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका वाढत नाही. जर अंड्यांचं सेवन नियमितपणे सामान्य प्रमाणात केलं तर हृदयाला कोणताही धोका नसतो. हा रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आला. यासाठी अभ्यासकांनी १९८४ ते १९८९ दरम्यान ४२ ते ६० वयोगटातील १९५० अशा पुरूषांवर अभ्यास केला ज्यांना कोणत्याही प्रकारची हृदयासंबंधी समस्या नव्हती.
यातील केवळ १,०१५ पुरुषांचाच संबंधित APOE फीनोटाइप डेटा उपलब्ध होता. या रिसर्चनुसार, या लोकांचं २१ वर्षांपर्यंत परिक्षण करण्यात आलं. परिक्षणादरम्यान साधारण २१७ स्ट्रोकच्या केसेस समोर आल्या. अभ्यासकांनुसार, यातील एकही स्ट्रोक ना डायटरी कोलेस्ट्रॉलमुळे होता ना अंड्यांचं सेवन केल्याने होता.
आणखीही काही मुद्दे
दरम्यान या रिसर्चबाबत आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. कारण या रिसर्चमध्ये लोकसंख्येच्या एका छोट्या भागावरच अभ्यास करण्यात आला. त्यासोबतच जे लोक रिसर्चमध्ये सहभागी होते, त्यांना रिसर्चदरम्यान कोणत्याही प्रकाकची हृदयासंबंधी समस्या नव्हती.