‘व्हॅलेन्टाइन डे’साठी स्ट्रीट फूडचं झक्कास प्लॅनिंग करायचं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:43 PM2018-02-13T17:43:51+5:302018-02-13T17:53:18+5:30
रोमॅण्टिक डेट म्हणजे नेहमी कॅन्डल लाइट डिनरच असायला हवं असा काही नियम नाही. रंगीबिरंगी गल्ल्यांमधून जोडीदाराचा हात हातात घेत अशा स्ट्रीट फूडची घेतलेली मजाही खास शुद्ध देसी रोमान्सचा अनुभव नक्की देईल.
- अमृता कदम
जे खाण्यापिण्याचे खरे शौकीन असतात, त्यांची गोष्टच निराळी. म्हणजे अशा लोकांना तुम्ही कितीही महागड्या भेटवस्तू दिल्या तरी त्यानं ते खूश होतीलच याची काही खात्री नसते. पण त्याऐवजी त्यांना चविष्ट पदार्थांची मेजवानी जिथे मिळेल तिथे घेऊन गेलात तर ते अगदी तृप्त होऊन जातील. मग जगातल्या कुठल्याही गोष्टीची किंमत त्यांना अशा स्वादापुढे कमीच वाटते. तुमचा जोडीदार जर असाच खाद्यप्रेमी असेल तर या ‘व्हॅलेन्टाइन डे’ च्या निमित्तानं ही काही ठिकाणं माहिती असायलाच हवीत. जर तुम्ही ‘फुडी कपल’ असाल तर ही अगदी परफेक्ट व्हॅलेन्टाइन डेस्टिनेशन ठरु शकतील.
दिल्ली
दिल्ली म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते स्ट्रीट फूड. इथल्या स्ट्रीट फूडची मजा घ्यायची असेल तर चांदनी चौकसारखं दुसरं ठिकाण नाही. जुनी दिल्ली तर अशा एकसे बढकर एक ठिकाणांचं भांडारच आहे. चाट, पराठा, छोले-भठुरे, गोलगप्पे अशा एक ना अनेक गोष्टींची व्हरायटी इथे उपलब्ध आहे. राजधानीत आल्यावर अस्सल खाद्यप्रेमी किमान एकदा तरी या चांदनी चौकला भेट देतातच. या जागेचं वैशिष्टय म्हणजे इथे तुम्हाला अगदी महाग आणि अगदी स्वस्त अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतात.
उत्तरप्रदेश
व्हॅलेन्टाइनच्या निमित्तानं उत्तर भारतातल्या या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचा इतिहास माहितीच हवा. वाराणसी हे इतिहासातलं सर्वात जुनं शहर मानलं जातं. या शहराइतकीच इथली खाद्यसंस्कृती पुरातन आणि रंगबिरंगी आहे. वाराणसीची प्रसिद्ध कचोरी-जलेबी, चूडामटर असो की लस्सी या सगळ्याची स्वतंत्र वैशिष्टयं आहेत. शिवाय या सगळ्यावरचा सर्वांत उत्तम उतारा म्हणजे बनारसचं ‘मघई’ पान. नवाबांच्या थाटात अवधी खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर तुम्ही थोडसं लखनौच्या दिशेनं वळायला हवं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ ही अशा तृप्त पाहुणचारासाठी प्रसिद्धच आहे. याशिवाय कानपूरमधलंही स्ट्रीट फूड हे प्रसिध्द आहेच.
बिहार
बिहारच्या खाद्यसंस्कृतीचं नाव निघालं की आधी आठवण येते ती लिठ्ठी-चोखाची. बिहारची राजधानी पाटणामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी या स्वादिष्ट लिठ्ठी-चोखाचे स्टॉल्स पाहायला मिळतील. याशिवाय झालमुडी, दहीचुरा, कलाकंद यासारख्या अनेक खास बिहारी स्टाइलच्या पदार्थांची चव इथे चाखायला मिळेल.
रोमॅण्टिक डेट म्हणजे नेहमी कॅन्डल लाइट डिनरच असायला हवं असा काही नियम नाही. रंगीबिरंगी गल्ल्यांमधून जोडीदाराचा हात हातात घेत अशा स्ट्रीट फूडची घेतलेली मजाही खास शुद्ध देसी रोमान्सचा अनुभव नक्की देईल. तेव्हा करताय ना विचार?