FIFA Football World Cup 2018 : खिलाडूवृत्ती शिकावी डेन्मार्ककडून...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:00 AM2018-06-29T10:00:00+5:302018-06-29T10:00:00+5:30
पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता.
सचिन खुटवळकर : पेनल्टी किक मिळाली की, गोल करण्याची आयती संधी प्राप्त होते. त्यासाठी खेळाडू अनेक उपद्व्याप करतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा जरासा धक्का लागला, तरी विव्हळण्याचे नाटक करतात. रेफ्रीने ते ग्राह्य धरले की पेनल्टी मिळते आणि बहुतेक वेळा पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये होते. रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत व्हीएआर तंत्राचा वापर करून पेनल्टी निश्चित करण्याचा पर्याय उपलब्ध असला, तरी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता. या पार्श्वभूमीवर पेनल्टीच्या बाबतीत २00३ साली डेन्मार्क-इराण संघांदरम्यानच्या सामन्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या सामन्यादरम्यान मध्यंतर (हाफ टाइम) झाल्याची घोषणा करणारी शिट्टी वाजली. या वेळी चेंडू इराणच्या गोलपोस्टजवळ पेनल्टी एरियात होता. शिट्टीचा आवाज आल्यामुळे इराणच्या खेळाडूने हाताने बॉल उचलला. मात्र, त्यामुळे नियमभंग झाल्याचे सांगत रेफ्रीने डेन्मार्कला पेनल्टी किक बहाल केली. या प्रकारामुळे इराणी खेळाडू चिडले आणि त्यांनी रेफ्रीकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. त्यानंतर डेन्मार्कचा कप्तान मॉर्टन विगहर्स्ट पेनल्टी किक मारण्यासाठी सज्ज झाला. इतक्यात डेन्मार्कचे प्रशिक्षक ओल्सन यांनी विगहर्स्टला बालावून घेत त्याला काही तरी सूचना केली. त्यानुसार, विगहर्स्टने बॉल गोलजाळीत न मारता, पायाने हळूच गोलपोस्टपासून लांब अंतरावर ढकलला. त्याच्या या कृतीमुळे मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित फुटबॉलप्रेमींनी मोठा जल्लोष करत विगहर्स्टचे कौतुक केले.
...म्हणून विगहर्स्टने चेंडू मारला गोलपोस्टच्या बाहेर
हाफ टाइम झाल्याची घोषणा करणारी शिट्टी वाजवली गेली होती ती एका आगाऊ प्रेक्षकाकडून. रेफ्रीने शिट्टी वाजविलीच नव्हती. त्यामुळे इराणी खेळाडूने बॉल हातात घेताच रेफ्रीने डेर्न्माकला पेनल्टी किक बहाल केली. खरे नाट्य यानंतर घडले. प्रेक्षकाचा आगाऊपणा लक्षात आल्यामुळे डेन्मार्कचे प्रशिक्षक ओल्सन यांनी पेनल्टी किक मारण्यासाठी सज्ज झालेला विगहर्स्ट याला तसे न करण्याची सूचना केली. यात इराणी खेळाडूची काहीच चूक नसल्याचे त्यांनी विगहर्स्टला पटवून दिले. त्यानंतर त्याने बॉल गोलजाळीत न मारता बाहेर लाथाडला.
विगहर्स्ट ठरला हिरो
- सहसा पेनल्टी किकची संधी कोणी वाया घालवत नाही. मात्र, खिलाडूवृत्ती जोपासत डेन्मार्कचा कप्तान मॉर्टन विगहर्स्ट याने गैरमार्गाने मिळालेल्या या संधीचा फायदा उठवला नाही.
- विगहर्स्टची ही कृती जगभर चर्चेचा आणि प्रशंसेचा विषय ठरली. या खिलाडूवृत्तीबद्दल त्याला २00३ सालचा ‘डॅनिश प्लेयर आॅफ द इयर’ हा किताब मिळाला. आॅलिम्पिक कमिटी फेअर प्ले अॅवॉर्डसाठीही त्याची निवड झाली.
- यात नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे, हा सामना डेन्मार्कने १-0 असा गमविला. परंतु खिलाडूवृत्तीमुळे मॉर्टन विगहर्स्ट व डॅनिश संघाने जगभरातील फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली