अंजीर : फळ कसे, हे तर फुलच !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:05 PM2022-08-19T13:05:18+5:302022-08-19T13:06:38+5:30
Fig : अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे.
जगातले सगळ्यात प्राचीन फळ कुठले? असा प्रश्न विचारला तर प्रामुख्याने ज्या फळाचे नाव घेतले जाते, ते फळ म्हणजे अंजीर. वड, पिंपळ, उंबर आणि अंजीर ही एकाच वंशातील फळे. आदीमानवाने अंजिराची लागवड सुरू केली. त्याच्या लक्षात आले की, हे झाड लावायला सोपे आहे. अंजिराची झाडे लावताना बियांची गरज लागत नव्हती. एक फांदी तोडून लावली की झाड रुजत होते. हे फळ आदीमानवाला आवडले. त्याने त्याची लागवड सुरू केली.
अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे. सुरूवातीला आशियाई खंडात लागवड झालेल्या या फळाने रोमन साम्राज्यात फार महत्त्वाचे स्थान पटकावले, इतके की रोमन झेंड्यावर अंजिराची पाने होती. रोमन लोक अंजिराला बाचूस किंवा मदिरा आणि मादकतेच्या देवाकडून माणसाला मिळालेली भेट मानत. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून सुरू झालेली अंजिराची आवड आजही कायम आहे.
एकेकाळी अंजिराला गरीब माणसाचे ‘सुपरफूड’ मानण्यात येत असे. रोमन आणि ग्रीक साम्राज्यात गुलामांसाठी जे जेवण तयार होत असे, त्यात अंजिराचे प्रमाण खूप असे. कारण त्याचे पोषणमूल्य खूप आहे याची जाणीव त्याकाळच्या लोकांना झाली होती. गुलामांच्या खडतर आयुष्यात हे सुपरफूड त्यांना मजबूत बनवी. मराठी विश्वकोशानुसार, अंजिराचे पोषणमूल्य उच्च असते. त्यापासून कॅल्शिअम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन (अ जीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते.
इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जड असेल तर अंजिराचा समावेश आहारात करायला हवाच. अंजीर ॲन्टिऑक्सिडंट म्हणूनही फार उपयोगी आहे. भारतासह पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान वगैरे देशांत मोठ्या प्रमाणात अंजिराचे पीक घेतले जाते. गंमत म्हणजे मानवी इतिहासातले हे पहिले फळ तांत्रिकदृष्ट्या फळच नाही. एक अंजीर म्हणजे हजार कलिका आहेत, बाहेरच्या बाजूला न फुलता, आतल्या आत राहिलेल्या!