मुंबईतील या हॉटेलमध्ये मिळतोय वेंन्डिग मशीनमधून स्वादिष्ट पिझ्झा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 03:12 PM2018-01-08T15:12:02+5:302018-01-08T15:28:17+5:30
पिझ्झा फार आवडतो पण त्यासाठी वाट पाहणं मान्य नाही? मुंबईतील या हॉटेलमध्ये आहे पिझ्झा वेंडींग मशिन
मुंबई : तुम्ही पिझ्झा वेंन्डिग मशिनविषयी कधी ऐकलंय का? कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये असं पिझ्झा वेंन्डिग मशीन ठेवण्यात आलंय. अवघ्या सहा मिनिटात तुम्हाला हवा असलेला पिझ्झा तुमच्यासमोर आलेला असेल.
आणखी वाचा - अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा
कांदिवलीतील पंचशील गार्डनजवळील राज ऑर्केडमध्ये ‘येस पिझ्झा’ नावाचं हॉटेल आहे. साहजिकच हे हॉटेल इतर हॉटेलांपेक्षा फार निराळं आहे. पिझ्झाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जातेय. हा मुळचा इटालियन पदार्थ असला तरीही अनेक भारतीय या पदार्थाच्या प्रेमात आहेत. भारतीयांकडून पिझ्झाची वाढती मागणी पाहता अनेक परदेशी कंपन्याही इकडे आल्या. डॉमिनोज, पिझ्झा हट, स्मोकिंग जोज अशा विविध कंपन्या पिझ्झासाठी प्रसिद्ध आहेत. पिझ्झाची वाढती मागणी पाहता या कंपन्यांनी आपल्या किंमतीही वाढवल्या. परिणामी अनेक स्थानिक हॉटेल्स व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या पद्धतीने पिझ्झा बनवायला सुरुवात केलीय. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात अनेक हॉटेल्समध्ये अगदी स्वादिष्ट पिझ्झा मिळतो. इटालियन पदार्थाला भारतीय टच देऊनही पिझ्झा बनवण्याची हटके स्टाईल काहीजण अवलंबताना दिसतात. पण मुंबईत असं एक हॉटेल आहे जिथून तुम्हला पिझ्झा घेण्यासाठी अवघा ६ मिनिटांचा कालावधी लागतो. कारण या हॉटेलमध्ये चक्क पिझ्झा वेंन्डिग मशिन ठेवण्यात आलंय. तुम्हाला हवं त्या पद्धतीचा पिझ्झा तुम्हाला इथं मिळू शकतो.
खाद्यविषयक बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
खरंतर पिझ्झा वेंडिंग मशीन इटालियन देशातच आढळून येतात. भारतात अद्यापही या मशिनची सुरुवात झाली नव्हती. पण येस पिझ्झा या हॉटेलने भारतातलं पहिलं पिझ्झा वेंडिंग मशीनला सुरुवात केली आहे. या मशिनमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक टोकन टाकावं लागणार आहे. टोकन टाकल्यानंतर समोर पर्याय येतात. त्या पर्यायांमध्ये तुम्हाला हवं असलेला पर्याय निवडायचा आणि ६ मिनिटं वाट पाहायची. अगदी सहाव्या मिनिटातच तुमच्यासमोर पिझ्झा आलेला असेल. इथं तुम्हाला ४ प्रकारचे पिझ्झा, २ प्रकारचे पॉपकॉर्न आणि ज्यूसचे तीन प्रकार मिळतील. या मशिनमधून केवळ पिझ्झाच येतो असं नाही, तर तुम्हाला अवघ्या २ मिनिटात पॉपकॉर्नही मिळतील.