खाण्यापिण्याच्या गोष्टी : ही थाळी खायची?- दहा हजार रुपये मोजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:44 AM2022-10-21T10:44:05+5:302022-10-21T10:46:28+5:30
दिवे, आकाशकंदील, रांगोळ्या.. ही दिवाळीशी संबंधित गोष्टींची यादी फराळ आणि मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळी आता फक्त भारतीयांचा सण राहिला नाही.
दिवे, आकाशकंदील, रांगोळ्या.. ही दिवाळीशी संबंधित गोष्टींची यादी फराळ आणि मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळी आता फक्त भारतीयांचा सण राहिला नाही. जगभरातले अनेक देश दिवाळीत रोषणाईने उजळून निघतात. अमेरिकेत टेक्ससमधल्या ह्युस्टन भागात एक महाप्रचंड दिवाळी मेळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात हजारो लोक सहभागी झाले आहेत. भारतीय अन्नपदार्थांची रेलचेल इथे आहे. यावर्षीच्या मेळ्याची थीम आहे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.
न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते गेली काही वर्षे अमेरिकेत भारतीय मिठाई या काळात मोठ्या प्रमाणावर विकली जाते. केशर बर्फी, चॉकलेट बर्फी, मलई सँडविच, काजू कतली, काजू रोल, जिलेबी, पेठा, पेढे, रसगुल्ले, लाडू या आणि अशा अनेक मिठायांनी दुकाने सजली आहेत. काही ठिकाणी मिठाई विकत घेण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. सुखदेव बावा यांचे महाराजा स्वीट्स हे न्यूयॉर्क शहरातल्या क्वीन्स भागातले गजबजलेले दुकान. १९८१ साली अमेरिकेत स्थलांतरित झालेले बावा आधी टॅक्सी चालवायचे. नंतर त्यांनी मिठाई विकायला सुरुवात केली. आज त्यांच्या दुकानात ऐंशीपेक्षा जास्त प्रकारच्या मिठाई मिळतात. नव्या मिठाईच्या शोधात बावांचे सहकारी भारताला भेटी देतात.
इंग्लंडमधल्या दिवाळीची मौजच वेगळी आहे. खुद्द ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरापासून ते छोट्या-छोट्या गल्ल्यांत दिवाळीनिमित्त खास खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. इथे घसिटाराम, हल्दीरामसारखी दुकाने आहेतच; पण त्याचबरोबर प्रत्येक भागात मिठाई मिळतात. दिवाळी निमित्ताने रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे लंडनवासीयांना आवडते. उत्तमोत्तम भारतीय उपाहारगृहे ब्रिटनमध्ये आहेत हे त्यामागचे महत्त्वाचे कारण. यातली काही उपाहारगृहे उच्चभ्रूंसाठी आहेत तर काही सर्वसामान्यांसाठी.
जामावार नावाच्या उपाहारगृहात खास दिल्ली स्पेशल थाळी आहे. किंमत दहा हजार रुपये! ढिशूम नावाच्या उपाहारगृहाच्या शाखांमध्ये मुंबई स्पेशल गोष्टी आहेत आणि सामान्यांनी दिवाळी गेट टुगेदर्ससाठी ढिशूमला पसंती दिली आहे.
भक्ती चपळगावकर,
मुक्त पत्रकार
bhalwankarb@gmail.com