Food: अच्छी सुरत आणि खान्देशची कचोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:18 PM2022-06-19T15:18:14+5:302022-06-19T15:19:01+5:30

Food: खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ, असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जिवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा; पण कधी- कधी थंडीच्या दिवसांत प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची.

Food: Good Surat and Khandesh Kachori! | Food: अच्छी सुरत आणि खान्देशची कचोरी!

Food: अच्छी सुरत आणि खान्देशची कचोरी!

googlenewsNext

संजय मोने, अभिनेते
खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ, असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जिवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा; पण कधी- कधी थंडीच्या दिवसांत प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची. हवा उत्तम. प्रेक्षक फार छान असायचे. शिवाय प्रयोगही बाराच्या आसपास संपायचा. खान्देशात जेवण फार चविष्ट असतं. शेंगदाण्याचा वापर असतो मसाल्यात... जळगावला माझा एक अत्यंत घनिष्ठ मित्र राहायचा. भय्या उपासनी त्याचं नाव. आता तो नाही. माझ्या आयुष्यात तो अचानक आला. आम्ही दोघे रात्र-रात्र गप्पा मारायचो. साथीला त्याचे एक दोन मित्र, काही उत्तम द्रव्य. शेवभाजी आणि भरीत भाकरी ही त्याने खायला घातली तशी आता पुन्हा मिळाली नाही. बनतही असेल उत्तम; पण आता तो नाही. वांग्यांचे तेलात फोडणी करून तुकडे टाकायचे, दाण्याचे कूट, थोडा काळसर मसाला, मस्त झणझणीत तिखटाबरोबर भाकरी. ज्वारीची उन्हाळ्यात, तर बाजरीची थंडीत... वरती तेल आणि एक अगम्य चटणी. जेवणाच्या ताटात स्वर्ग यायचा. हुरडा-बिरडा हा प्रकार खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पोट बंड करून उठतं म्हणून मला फारसा आवडत नाही. असे इतरही पदार्थ आहेत... तर जळगावचा एक किस्सा.
एका नाटकाचा प्रयोग होता. भैयाच्या घरी सकाळी नेहमीप्रमाणे पोहोचलो. जेवण उत्तम झालं. छानपैकी झोपही झाली. संध्याकाळी प्रयोगाला निघायचं म्हणून आवराआवर केली. अचानक भैया म्हणाला,
‘चल कचोरी खाऊया.’ 
‘कुठं?’ 
‘इथं जवळच.’ 
आम्ही त्याच्या बुलेटवरून कचोरीवाल्याकडे पोहोचलो.
भैया पुन्हा एकदा उद्गारला- 
‘चेहरा आवडला नाही, तर कचोरी देत नाही हां तो.’ 
‘म्हणजे?’ 
‘म्हणजे तू त्याला कुरूप वाटलास तर कचोरी मिळणार नाही.’
आरशात आपण नेहमी बघतोच. मला काळजी वाटायला लागली. जर मी त्याला कुरूप वाटलो तर? आणि हे सगळ्यांना कळलं तर? नकोच विषाची परीक्षा.
‘मला तशी फार भूक नाहीये’ टाळायला म्हणून मी म्हणालो.
भैया त्याचं नेहमीचं गडगडाटी हास्य करून म्हणाला- 
‘आपण कसंही दिसत असलो तरी आपल्याला खायला मिळेल.’
भैया रुबाबदार. त्यामुळं त्याला मिळाली असती कचोरी, प्रश्न माझ्या साजीऱ्या रूपाचा होता. गाडी त्या कचोरीवाल्याकडं थांबली. मस्त कचोरी. धने आणि बडीशेप बेसन घातलेली एकदम हलकी टम्म फुगलेली. त्यावर दोन प्रकारच्या चटण्या आणि दही. एकदम मधुर. कोथिंबीर पेरलेली. थोडा कापलेला कांदा. भसाभस संपवली. पैसे देऊन झाल्यावर भैयाने ओळख करून दिली. त्यावर तो कचोरीवाला म्हणाला- 
‘अच्छी सुरत पायी हैं आपने, कभी भी आजाना!’ इतकं समाधान कधीही मिळालं नाही. आता माझ्या दिसण्याबद्दल मी निर्धास्त आहे.

Web Title: Food: Good Surat and Khandesh Kachori!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.