Food: मलैयो - लोणी आणि सायीचा कापूस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:22 AM2023-09-15T10:22:42+5:302023-09-15T10:23:04+5:30
Food: तुम्ही कधी कापसागत असणारा, तोंडात घालताच विरघळणारा अद्वितीय चवीचा पदार्थ खाल्लाय का ? नसेल, तर हा पदार्थ - मलैयो - खायला तुम्हाला वाराणसीला जावे लागेल आणि तेही कडाक्याच्या थंडीत!
- शुभा प्रभू साटम
(खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)
तुम्ही कधी कापसागत असणारा, तोंडात घालताच विरघळणारा अद्वितीय चवीचा पदार्थ खाल्लाय का ? नसेल, तर हा पदार्थ - मलैयो - खायला तुम्हाला वाराणसीला जावे लागेल आणि तेही कडाक्याच्या थंडीत!
मलैय्यो म्हणजे भरपूर फेटलेले लोणी किंवा साय आणि त्यावर किसमिस / बदाम / पिस्ते, किंचित पिठीसाखर. बस. पदार्थ निव्वळ स्वर्गीय आणि अतुल्य चवीचा. अस्सल दुधाची घट्ट खापरासारखी साय किंवा लोणी इतके फेटायचे की त्याचा पांढराशुभ्र कापूस व्हायला हवा. बुढ्ढी के बाल असतात तसे दिसायला लागले की, अगदी अलगदपणे द्रोणात भरायचे आणि द्यायचे.
वाराणसीच्या हिवाळ्यात पहाटे ५ ते ११ याच वेळेत हा मलैयो मिळतो. सूर्य वर चढला की बंद. कारण मलैय्योचा पोत उन सहन करू शकत नाही आणि हजारो पर्यटक हा खायला वाराणसीत डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतात.
मोठाल्या द्रोणात पिंजलेल्या कापसासारखा हा मलैयो वरून बदाम पिस्त्याची पखरण पेहेनून येतो, सोबत लाकडी चमचा. वाटीमध्ये दिला जात नाही, वास्तविक चोखंदळ खाणारे फक्त बोटांनी हा उचलून खातात. जसे आपण श्रीखंड खातो तसेच! (स्पूनने श्रीखंड खाणे हा शुद्ध माठ प्रकार) मलैय्योचा घास घेतला की, एक अविस्मरणीय चव अलगद जिभेवर पसरत जाते. इथे चवीचा स्फोट नाही तर नजाकतीने चव चढते. आणि ती तशीच असायला हवी. पहाटेची झुंझुरक्याची वेळ, आजूबाजूच्या देवळातून ऐकू येणाऱ्या आरत्या, घंटा नाद, भणाणणारा गार वारा, आणि हातात येणारा हा मलैयो! - एका द्रोणात पोट भरते.
वाराणसीच्या चिंचोळ्या बोळकांड्या, गल्ल्या, चौक, ठिकठिकाणी हा पदार्थ विकणाऱ्या गाड्या दिसतील. असे म्हणतात की अस्सल मलैयो अगदी राम प्रहरी बाहेर ठेवतात, सकाळचे दंव पडायला लागले की, मग साय / लोणी फेटायला घेतले जाते, आता त्या दवबिंदूचे गारूड असावे की, काय पण बघता बघता एक देखणा ढग आकार घेतो. मलैय्यो खाऊन, चालता चालता वाटेत लागणाऱ्या मंदिरांना हात जोडत मग कोणत्याही कचोडी, पूडी, सब्जी विकणाऱ्या ठेल्यापाशी थांबायचे, तोपर्यंत सूर्य उगवलेला असतो... मग गोडमिट्ट चहा घेऊन नदी काठी बसून आयुष्याचा विचार करायचा!
(shubhaprabhusatam@gmail.com)