Food recipe: शिळी पोळी आणि शिळा भात उरलाय का? झटपट करा 'माणिकमोती'; वाचा रेसेपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:09 PM2023-03-01T12:09:29+5:302023-03-01T12:10:15+5:30
Food recipe: एक अशी रेसेपी, ज्यामुळे शिळे पदार्थ संपतीलही आणि सगळ्यांच्या पसंतीस पडतीलही!
शिळे पदार्थ उरले की ते संपवायचे कसे हा गृहिणींना मोठा प्रश्न पडतो. घरचे कोणीच शीळवण खात नाहीत. सगळ्यांना ताजा स्वयंपाक लागतो. त्यामुळे बिचाऱ्या गृहिणी शिळे पदार्थ संपवायची जबाबदारी स्वतःकडे घेतात. त्यावर पर्याय म्हणून ही रेसेपी वाचा आणि जरूर ट्राय करा. जेणेकरून शिळ्या पोळ्या आणि शिळा भात संपेलही आणि घरातल्या मंडळींच्या पसंतीस पडेलही! फूड ब्लॉगर वैदेही भावे यांच्या चकली.कॉम या संकेत स्थळावरून साभार.
साहित्य:
४ आदल्या दिवशीच्या पोळ्या (चपात्या)
१ कप शिजलेला भात (आदल्या दिवशीचा)
फोडणीसाठी:
२ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेस्पून मटार
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेला नारळ
कृती:
१) पोळ्यांचा हाताने कुस्कारा करून घ्यावा किंवा मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे. भात हाताने मोकळा करून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून आधी त्यात शेंगदाणे परतून घ्यावे. नंतर त्यातच मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. त्यात कांदा आणि मटार घालून परतावे. अंदाजे मिठ घालावे.
३) कांदा निट परतला गेला गॅस मध्यम करून त्यात भात घालावा. निट मिक्स करून बारीक केलेल्या पोळ्या घालून निट परतावे. साखर घालून १ वाफ काढावी. लिंबाचा रस चवीनुसर घालावा.
कोथिंबीर आणि ओल्या खोबर्याने सजवावे. गरमागरम सर्व्ह करावे.