Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:34 PM2022-11-25T14:34:49+5:302022-11-25T14:35:35+5:30

Food:

Food: Secrets of dried winter fruits | Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

googlenewsNext

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार

हिवाळा हा ऋतू जसे आल्हाददायक वातावरण घेऊन येतो तसेच खाण्यापिण्याची चंगळ करतो. बाजारात ताज्या भाज्या, कंदमुळे, फळफळावळ याचबरोबर सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. भारतातल्या कोणत्याही प्रांतात जा, हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी सुकामेवा आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनतात. हजारो वर्षांपासून जगभरातल्या लोकांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम सुकामेवा करतो आहे. असे म्हणतात की, झाडावरून खाली पडून वाळलेली फळे रुचकर लागतात आणि ऊर्जाही देतात याची जाणीव आदिमानवालाही झाली होती. 

मेसोपोटेमिया, ग्रीक, रोमन, भारतीय अशा अनेक प्राचीन नागर संस्कृतींमध्ये आहारात वाळवलेल्या फळांचा आणि फळांच्या बियांचा समावेश होता. सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वी आजच्या आखाती देशांच्या प्रदेशात खजुराच्या झाडांची लागवड सुरू झाली. खजुराला मोठ्या प्रमाणात फळ धरते. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवून त्यापासून अनेक पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. अनेकदा इतर फळे सुकवताना ती खजुराबरोबर सुकवली तर खजुरातली साखर त्यांच्यात उतरते हे लक्षात आले आणि तशा पद्धतीने फळे सुकवण्यास सुरुवात झाली. अंजिराचा उपयोग तर खूप आधीपासून होत होता. अंजीर हे गरिबांचे शक्तिवर्धक खाद्य म्हणून प्रसिध्द होते. ग्रीक गुलाम आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खात. 

सुक्यामेव्यात वाळवलेल्या पदार्थांबरोबरच फळांच्या बियांचाही समावेश होतो. इराणमध्ये सुरुवात झालेला बदाम आज जगभरात सगळ्यात जास्त लोकप्रिय सुकामेवा आहे. अमेरिका, इराण, तुर्कस्थान, मोरोक्को वगैरे देशांत बदामाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, तर ब्राझीलमध्ये जन्मलेल्या काजूची लागवड करणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाने सुकामेव्यातल्या घटकांचा शोध घेऊन कशात ओमेगा थ्री जास्त आहे, कोणत्या मेव्यात प्रोटीन जास्त आहे याचा शोध घेतला नव्हता, पण हे पदार्थ खाल्ल्याचे फायदे मात्र नोंदवून ठेवले, पुढच्या पिढीला सांगितले आणि त्याची लागवड, वापर सुरूच राहिला. पूर्वजांच्या हुशारीमुळे आजही हा मेवा आपल्याला उपलब्ध आहे. त्याचे योग्य सेवन ऋुतूनुसार केले तर नक्कीच फायद्याचे ठरेल. 
(bhalwankarb@gmail.com)

Web Title: Food: Secrets of dried winter fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न