Food: सूप, स्टर फ्राय व्हेजी, पास्ता, थाय करी..., बदलतोय भारतीय जेवणाचा बाज
By मनोज गडनीस | Published: August 29, 2022 09:45 AM2022-08-29T09:45:07+5:302022-08-29T09:45:38+5:30
Food: लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर परदेशी मालिका फक्त पाहिल्याच नाहीत तर तिथली जीवनशैली देखील जमेल तितकी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक प्रत्यय हा गेल्या काही दिवसांत भारतीयांच्या जेवणात झालेल्या बदलांद्वारे दिसून येत आहे.
- मनोज गडनीस
(विशेष प्रतिनिधी)
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर परदेशी मालिका फक्त पाहिल्याच नाहीत तर तिथली जीवनशैली देखील जमेल तितकी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक प्रत्यय हा गेल्या काही दिवसांत भारतीयांच्या जेवणात झालेल्या बदलांद्वारे दिसून येत आहे. पारंपरिक भारतीय जेवणाच्या तुलनेत कॉन्टिनेन्टल, इटालियन, कोरियन पदार्थांचे प्रमाण वाढत असून विशेष म्हणजे हे पदार्थ घरीच बनविण्याचाही कल वाढताना दिसत आहे आणि ग्राहकांचा हा वाढता कल बघून व्यापाऱ्यांनीही आता त्या पदार्थांचे सामान उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पाश्चात्यांचे जेवण म्हणजे मांसाहार ही संकल्पना आता मागे पडली असून तेथे शाकाहाराचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मात्र, उत्तम दर्जाच्या तेलात परतलेल्या भाज्या, वेगवेगळ्या सॉसने त्यात केलेले रुचीरंचन, वेगवेगळी सूप्स, थाय करी, पास्ता, होम-मेड पिझ्जा आदी पदार्थ अधिकाधिक आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न होताना दिसत असून त्याचेच प्रतिबिंब भारतीय किचन्समधून उमटताना दिसत आहे.
कोल्ड प्रेस, ऑलिव्ह ऑईल घेता का?
भारतीय जेवणामध्ये प्रत्येक ऋतुनिहाय वेगवेगळ्या तेलांचा वापर होतो. पण कमी उष्मांक असलेल्या तेलांचा प्रसार सध्या बाजारात जोरात असून कोल्ड प्रेस ऑईल तसेच ऑलिव्ह ऑईलला विशेष मागणी आहे. या दोन्ही तेलाच्या किमती या तुलनेने महाग आहेत. मात्र, तेलाची स्वतःची चव आणि पदार्थात त्यांचा वापर केल्यानंतर पदार्थाची वाढणारी चव यामुळे या तेलाच्या मागणीत देखील वाढ होताना दिसत आहे.
एक्झॉटिक भाज्यांना वाढती मागणी
लाल-पिवळी सिमला मिर्ची, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, सेलेरी, मशरूम्स, लाल कोबी, झ्युकिनी अशा भाज्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.
काही दुकानदारांनी तर या सर्व भाज्यांचा पॅक करूनच विकायला सुरुवात केली आहे.
या सर्व भाज्यांचे एक किंवा दोन नग घेत सर्व भाज्या खरेदी केल्या तर याची अंदाजे किंमत ही २२० रुपये ३०० रुपयांच्या दरम्यान होते.
थाय करी करण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थाय बेझिल किंवा थाय करीच्या घटकांचा बॉक्स देखील १०० रुपयांत अनेक बाजारात उपलब्ध आहे.
नूडल्स, पास्ताही, पिझ्झाही घरीच...
पूर्वी लोकांना फक्त विशिष्ट ब्रँडची मसालेदार नूडल्स ठाऊक होती. आता मात्र, वेगवेगळ्या कंपन्यांची नूडल्स बाजारात आली आहेत. यामध्ये राईस नूडल्स, व्हीट अर्थात गव्हापासून बनविलेली नूडल्स, फ्लॅट नूडल्स असे वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यातही लो-कॅलरी, ग्लूटेन फ्री वगैरे असे कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असलेले नूडल्सही बाजारात आहेत.
या नूडल्सच्या प्रकाराप्रमाणेच पास्ताचे प्रकारही उपलब्ध आहेत.
पास्ता किंवा नूडल्सला हॉटेलसारखी चव यावी, याकरिता व्हाईट किंवा रेड सॉस रेडिमेडही बाजारात उपलब्ध आहेत. तर काही लोक हे सॉसही घरीच बनवत आहेत. त्या करिता लागणारा कच्चा माल देखील बाजारात आता सर्रास उपलब्ध आहे.
पिझ्झासाठी लागणाऱ्या ब्रेडचेही अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असून ग्लूटेन फ्री किंवा गव्हाचा किंवा अनेक धान्यांपासून बनविलेला मल्टीग्रेन ब्रेड यालाही मोठी मागणी आहे.