Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:00 PM2021-09-07T16:00:14+5:302021-09-07T16:07:37+5:30
Ganesh Utsav Special Recipe : हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता.
गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच उरलेत. सगळ्यांच्याच घरी फराळाचं सामान, नैवेद्याचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू झालीये. मोदकांशिवाय बाप्पाच्या नैवेद्याला दुसरं काय बनवता येईल. असा विचार तुम्हीही करत असाल तर एक भन्नाट आयडिया आम्ही सांगणार आहोत.
कोरोनाकाळात आजारांना लांब ठेवण्यासाठी आरोग्य जपणही फार महत्वाचं झालंय म्हणूनच आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. गणरायाच्या नैवेद्यासाठी हेल्दी आणि टेस्टी खजुराजे लाडू उत्तम पर्याय आहेत. हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता.
साहित्य :
एक कप खजूर
सुका मेवा ( बारिक कापलेले काजू, बदाम, पिस्ता,मनुके)
तीन चमचे मावा
एक कप दूध
एक कप साखर
अर्धा चमचा वेलची पावडर
दोन मोठे चमचे ओल्या नारळाचं खोबरं
कृती :
१) सर्वात आधी खजूराच्या बिया काढून ते छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे तुकडे अर्धा कप दुधामध्ये भिजवून मिक्सरमधून बारिक करून त्याची पेस्ट तयार करा.
२) आता गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पिस्ता, खजूर आणि साखर टाकून जवळपास 5 मिनिटांपर्यंत परतून घ्या. तुम्ही साखरेऐवजी गूळही वापरू शकता.
३) मिश्रण चांगलं परतल्यावर त्यामध्ये मावा आणि दूध टाकून शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये वेलचीची पावडर आणि बारिक केलेला सुका मेवा टाकून एकत्र करा आणि गॅस बंद करा.
४) मिश्रण हाताल चिटकू नये म्हणून तळव्यावर थोडं तूप लावून घ्या. मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने गोल लाडू वळून घ्या. खोबऱ्यामध्ये लाडू घोळवून घ्या.
५) तयार आहेत बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असे खजूराचे लाडू.