गुलाबाच्या कळीपेक्षा पाकळी गुणकारी; एक-दोन नव्हे, सहा आजार दूर सारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:56 PM2019-04-26T13:56:46+5:302019-04-26T14:06:04+5:30
उन्हाळ्यामध्ये लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम दिसून येतात. या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही. तसेच लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त थंड पदार्थांचा समावेश करतात.
(Image Cedit : Lavanya Ayurveda)
उन्हाळ्यामध्ये लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम दिसून येतात. या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही. तसेच लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त थंड पदार्थांचा समावेश करतात. ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणवणारी उष्णता कमी होते. अशाच एक पदार्थाबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत, तो म्हणजे गुलकंद. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येणारा गुलकंद चविष्ठ असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. गुलकंद शरीराला थंडावा देण्यासोबतच आरोग्याच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो.
आयुर्वेदातही गुलकंदाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. गुलकंद तया करण्यासाठी गुलाब पाकळ्या आणि खडीसाखरेचा वापर करण्यात येतो. तुम्ही घरच्या घरीही अगदी सहज हा पदार्थ तयार करू शकता. गुलाबशेती करणारे अनेकजण जोडधंदा म्हणून गुलकंदनिर्मिती करतात. जाणून घेऊया गुलकंद तयार करण्याची कृती...
गुलकंद तयार करण्याची कृती :
साहित्य :
- गुलाब पाकळ्या
- खडी साखर
कृती :
- गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल गुलाबांचा वापर करावा. म्हणजेच, गुलकंदाला रंग आणि सुगंध चांगला येतो. देशी गुलांबांच्या तुलनेत विदेशी गुलाबांना जास्त सुगंध नसतो.
- गुलाबाची फुलं घेऊन त्यांच्या निरोगी पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारिक तुकडे करावे. त्यामध्ये खडीसाखर एकत्र करावी. एक काचेची बरणी घेऊन त्यामध्ये एक थर पाकळ्या आणि एक थर खडीसाखर असं काचेच्या बरणीमध्ये भरावे.
- काचेची बरणी उन्हामध्ये 4 ते 5 दिसांसाठी ठेवावी. उन्हामुळे बरणीतील खडीसाखरेचे पाणी होतं आणि त्या साखरेच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या मुरतात. असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांमध्ये खाण्यासाठी तयार होतो.
गुलकंदाचे फायदे :
1. पोटाच्या समस्यांपासून सुटका
उन्हाळ्यामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच गुलकंदाच्या सेवनाने आपण या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो. दररोज गुलकंद खाल्याने भूक वाढते. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
2. माउथ अल्सरपासून सुटका
नेहमी असं दिसून येतं की, पोटातील उष्णता वाढल्यामुळे माउथ अल्सरची समस्या होते. गुलकंदाच्या सेवनाने यापासून सुटका होते. याव्यतिरिक्त गुलकंदच्या सेवनाने त्वचेशी निगडीत सर्व समस्या दूर होतात.
3. घामापासून सुटका
उन्हाळ्यात शरीरामध्ये खूप घाम येतो आणि त्यामुळे शरीराला दुर्गंधी येते. गुलकंद घाम येण्याच्या समस्येवरही लाभदायी ठरतो. याव्यतिरिक्त गुलकंद शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही मदत करतो.
(Image Cedit : iStock)
4. डोळ्यांसाठी फायदेशीर
गुलकंद खाणं डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. गुलकंदाचं सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, मोतिबिंदू यांसारख्या समस्यांवर परिणामकारक ठरतो गुलकंद. याव्यतिरिक्त गुलकंद डोळ्यांना थंडावा देण्याचंही काम करतो.
5. मुलांसाठी लाभदायी
गुलकंद लहान मुलंसाठी पौष्टिक ठरतो. उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पोटाच्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी गुलकंद मदत करतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येण्याच्या समस्येचा अनेक लहान मुलांना आणि मोठ्यांनाही करावा लागतो. त्यासाठीही गुलकंद फायदेशीर ठरतो.
6. इतर फायदे
गुलकंदाचे सेवन केल्याने थकवा, अस्वस्थपणा, अंगदुखी, तणाव यांसारख्या समस्यां दूर करण्यासाठी गुलकंद मदत करतो. अनेक तज्ज्ञांच्या मते, गुलकंद स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही मदत करतो. सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठीही तुम्ही गुलकंदाचे सेवन करू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.