शेवग्याच्या भाजीने शरीराला काय मिळतात फायदे? वाचाल तर रोज खाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:31 AM2024-11-04T11:31:21+5:302024-11-04T11:31:52+5:30
Moringa Benefits: शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचं नियमितपणे सेवन केलं तर इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच शरीराचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
Moringa Benefits: शेवग्याची पाने, फूलं, बीया, शेंगा यांचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हे एक अस झाड आहे ज्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भरपूर लोक शेवग्याची शेंगाची, पानांची भाजी आवडीने खातात. पण त्यांना याचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतात. शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शिअम, आयर्न आणि प्रोटीन असे पोषक तत्व असतात. शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचं नियमितपणे सेवन केलं तर इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच शरीराचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. अशात शेवग्याचे शरीराला काय काय फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शेवगा खाण्याचे फायदे
१) इम्यूनिटी वाढते
शेवग्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीराची वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांसोबत लढण्याची क्षमता वाढते.
२) हृदयासाठी फायदेशीर
शेवग्याच्या भाजीचं सेवन हृदयासाठी भरपूर फायदेशीर असतं. कारण या भाजीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
३) सूज कमी होते
शेवग्याच्या नियमित सेवनाने शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. ज्यामुळे वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.
४) पचन सुधारतं
शेवग्याच्या पानांच्या भाजीचं नियमितपणे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. तसेच पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, बद्धकोष्ठताही दूर होते.
५) प्रोटीन
जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रोटीन मिळवण्यासाठी कशाचं सेवन करावं? असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही शेवग्याचं नियमित सेवन करू शकता. यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल.
कशी बनवाल शेवग्याची भाजी?
शेवग्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ करा आणि नंतर शेंगावरील कवच हलकं काढा. नंतर शेंगांचे छोटे तुकडे करा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये शेंगा, कापलेले बटाटे, टोमॅटो, पाणी आणि थोडं मीठ टाका. २ ते ३ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.
आता एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात थोडं जिरं, कापलेला कांदा, बारीक केलेला लसूण, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि कोथिंबीर टाका. मसाला चांगला तयार झाल्यावर त्यात कापलेला टोमॅटो टाका. नंतर त्यात शेंगा टाकून वरून थोडं पाणी टाका. टेस्टनुसार मीठ टाका. भाजीला उकडी आल्यानंतर गॅस बंद करा.