खुशखुशीत भाजणीचे थालीपीठ एकदम मस्त; पटकन करा फस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:44 PM2019-03-23T18:44:25+5:302019-03-23T18:53:43+5:30
आपण जेवणामध्ये दररोज चपाती किंवा पोळीचा समावेश करतो. पण गव्हाच्या चपातीपेक्षा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं थालीपीठ.
आपण जेवणामध्ये दररोज चपाती किंवा पोळीचा समावेश करतो. पण गव्हाच्या चपातीपेक्षा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं थालीपीठ. अनेकदा बाजारात मिळणारा तयार आटा आणला जातो. पण त्यापेक्षा घरात तयार केलेलं पिठ अत्यंत फायदेशीर आणि शुद्ध असतं. साध्या चपातीच्या पिठाप्रमाणेच तुम्ही थालीपीठाचं पिठंही घरीच तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला घरीच वेगवेगळी धान्य एकत्र करून पिठ तयार करावं लागतं. सकाळच्या नाश्त्यासाठी थालीपीठ अत्यंत फायदेशीर ठरतेच, तुम्ही रात्रीच्या जेवणामध्येही याचा समावेश करू शकता. याशिवाय तुम्ही डायबिटीजने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी थालीपीठ खाणं फायद्याचं ठरतं.
साहित्य :
- 1/4 कप ज्वारीचं पिठ
- 1/4 कप बाजरीचं पिठ
- 1/4 कप गव्हाचं पिठ
- 2 टेबल स्पून बेसन
- 1/4 कप नाचणीचं पिठ
- 1/4 कप बारिक कापलेला कांदा
- 3 टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर
- 1/4 कप बारिक कापलेला टॉमेटो
- 1 टी स्पून बारिक चिरलेली हिरवी मिरची
- 1 टी स्पून लाल मिरची पावडर
- 1/4 टी-स्पून हळद
- मीठ चवीनुसार
- तेल किंवा तूप
कृती :
- सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करून पाण्याच्या मदतीने पिठ मळून घ्या.
- त्यानंतर एक कॉटनचा रूमाल घेऊन तो पाण्यात भिजवून घ्या.
- त्यावर पिठाचा गोळा घेऊन भाकरीप्रमाणे थापून घ्या.
- तुम्ही प्लॅस्टिकच्या शीटचा वापर करून लाटण्याच्या सहाय्याने लाटूही शकता.
- त्यानंतर तयार थालीपीठ तव्यावर खरपूस भाजून घ्या.
- तव्यावर भाजताना तेलाचा किंवा तूपाचा वापर करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.
- दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता गरमा गरम थालीपीठ.