असा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 04:51 PM2018-08-19T16:51:37+5:302018-08-19T16:51:52+5:30
प्रत्येकाच्या हाताला चव जशी वेगळी असते तसा प्रत्येकाचा मसाले भातही वेगवेगळा असतो. चला तर बघूया एका भन्नाट मसालेभाताची कृती
पुणे : मसालेभात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. काही ठिकाणी भाज्या घालून तर काही ठिकाणी फक्त मसाले वापरूनही केला जातो. प्रत्येकाच्या हाताला चव जशी वेगळी असते तसा प्रत्येकाचा मसाले भातही वेगवेगळा असतो. चला तर बघूया एका भन्नाट मसालेभाताची कृती
आवश्यक साहित्य :
तांदूळ (शक्यतो जाड )
लाल तिखट
गरम मसाला
आले
लसूण
मोहरी, जिरे, हळद
कांदा
टोमॅटो
कोथिंबीर
तेल
मीठ
पाणी
कांदा लसूण मसाला
भाज्या :(आवडीनुसार)
मटार
वांगी
बटाटा
तयारी :
तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत, कांदा उभा चिरावा, टोमॅटो आणि इतर भाज्या आवडीप्रमाणे मध्यम चिराव्यात.आलं, लसणाचे बारीक तुकडे करून घ्यावेत. तांदुळाच्या बरोबर दुप्पट पाणी उकळण्यास ठेवावे.
कृती :
तेलात तडतडल्यावर जिरे घालावेत. लसूण, आलं टाकावं,त्यात उभा चिरलेला कांदा परतण्यास टाकावा. साधारण एक वाटी तांदुळासाठी दोन मध्यम कांदे घ्यावेत.
कांदे गुलाबी परतल्यावर त्यात टोमॅटो घालावेत. टोमॅटो ३० ते ४० सेकंड परतल्यावर त्यात मटार, बटाटा, वांगी टाकावीत. सर्व भाज्या नीट परतवून त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकावा, त्यात अर्धाचमचा कांदा लसूण मसाला घालावा. सर्व मसाले एकत्र करून भाज्यांना दोन मिनिटे वाफ द्यावी.
या भाज्यांमध्ये तांदूळ टाकून परतवून घ्यावा.त्यात मीठ, कोथिंबीर घालून छान एकत्र करून घ्यावे. तांदूळ खाली लागू देऊ नये. नंतर त्यात पाणी टाकावे. सर्व मिश्रण ढवळून घेतल्यावर उकळी येऊ द्यावी. भात शिजायला सुरुवात झाल्यावर कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या घ्याव्यात.
शिट्ट्या झाल्यावर लगेच गॅस बंद करून भात वाफेवर होऊ द्यावा. वाफ संपल्यावर गरमागरम तूप घालून भात सर्व्ह करावा. या सोबत पापड, लोणचे आणि आवडत असल्यास ताक किंवा दही घेता येते.
सर्व भाज्या असल्यामुळे हा भात चवदार तर होतोच पण पौष्टिक असल्यामुळे एखाद्या वेळेच्या जेवणाला पर्यायही ठरू शकतो.